नागपूर : रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर असलेले सीओपी (कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म) शेड काढले जाणार आहे. पुनर्विकासा अंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात शेड काढले जाणार असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
अमृत भारत योजनेअंतर्गत येथील रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्या संबंधाने प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या हायटेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकरण करण्यासाठी अनेक बदल केले जात आहे. जुने काम काढून त्या ठिकाणी नवीन काम केले जात आहे.
रेल्वे स्थानकावरच्या फलाट क्रमांक ८ च्या ईटारसी मार्गाचे टोकावर असलेले सीओपी शेड काढून त्या ठिकाणी नवीन शेड टाकण्याचे काम १८ जुलैपासून सुरू होणार आहे. त्या ठिकाणी चांगले (एलिवेटेड कॉनकोर्स) लावले जाणार आहे. हे करतानाच विविध रेल्वे गाड्यांचे जाणे - येणे या फलाटावरून सुरूच राहणार आहे. त्यामुळे या गाड्यांमधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांना पावसाचा सामना करावा लागणार आहे. गाडी आली असतानाच मुसळधार पाऊस सुरू असल्यास उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची भीती आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनासीओपी काढण्याच्या कामादरम्यान प्रवाशांना कसल्याही प्रकारची दुखापत होऊ नये किंवा त्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने येथे सुरक्षेच्या प्रोटोकालचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, या फलाटावर २४ तास सिक्युरिटी मार्शल तैनात केले जाणार आहे. काम सुरू असताना संबंधित मशिनरीवर कुशल कामगार आणि पर्यवेक्षक नेमले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने काढण्यात येणाऱ्या शेडचे साहित्य तातडीने तेथून हलवून सुरक्षित ठिकाणी हलविले जाणार आहे.
प्रवाशांना सतर्कतेचे आवाहनरेल्वे प्रशासन सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणार आहेत. मात्र, प्रवाशांनीसुद्धा आवश्यक खबरदारी घ्यावी आणि फलाटावरून येणे-जाणे करताना सर्तकता बाळगावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. काही समस्या आल्यास तातडीने स्टेशन मास्तर किंवा तेथील कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.