नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील कोरोनाबाधित ३५ वर्षीय रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना वॉर्ड ४९ मधून तो खिडकीच्या काचा फोडून पळून गेला. मेडिकल प्रशासनाला ही बाब दुपारनंतर कळल्यावर अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाल्याने प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करीत आहे. सात दिवसापूर्वी मनोरुग्णालयातील एक तर मागील चार दिवसात आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलच्या वॉर्ड क्र. ४९ या कोविड वॉर्डात इतर रुग्णांसोबत या तिन्ही रुग्णांवर उपचार सुरू होते. तिघांना सौम्य लक्षणे होती.
शनिवार सकाळच्या वेळी वॉर्डातील स्वच्छतागृहातील काच फोडून एक ३५वर्षीय मनोरुग्ण पळून गेला. परंतु रुग्ण पळाल्याची माहिती दुपारनंतर मेडिकल प्रशासनाला कळली. त्यांनी लागलीच याची माहिती मनोरुग्णालयाला दिली. रुग्णालयाने त्याच्या कुटुंबीयांना दिली. शोधाशोध करूनही रुग्ण सापडला नाही. यामुळे सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोरोनाबाधित मनोरुग्ण पळून गेल्याने आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. रुग्ण पळून गेल्याच्या घटनेला मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी दुजोरा दिला आहे.
रुग्ण पळून जाण्याची चौथी घटना
कोरोनाच्या पहिल्या लाटेत १५ जुलै २०२० दरम्यान मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड हॉस्पिटलमधून एक पुरुष व एक महिला रुग्ण पळून गेली होती. नंतर पोलिसांनी पकडून आणून पुन्हा वॉर्डात भरती केले होते. तर, दुसऱ्या लाटेत आणखी एक रुग्ण पळून गेला होता. या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आता मेडिकलच्या मुख्य इमारतीपासून दूर असलेल्या वॉर्ड ४९ हा कोविडचा वॉर्ड करण्यात आला आहे. त्याचा फायदा घेत हा रुग्ण पळून गेल्याचे बोलले जात आहे.