आशिष रॉय
नागपूर : महामेट्रोचानागपूरमेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यास अडीच वर्षे उशीर झाला आहे. त्यातच या प्रकल्पातील गुंतवणूक एक हजार कोटींनी वाढली आहे. या गुंतवणूक वाढीचा परिणाम प्रकल्पाच्या पूर्णत्वावर होणार नसल्याचा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक ८,६८० कोटी रुपये असल्याचे विस्तृत प्रकल्प अहवालात नमूद आहे. आता गुंतवणुकीत १२ टक्क्यांची वाढ होऊन एकूण गुंतवणूक ९७२० कोटींवर गेल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार होता. पण सध्या केवळ ५० टक्के मार्गावर मेट्रो धावत आहे.
मार्च २०२० मध्ये कोविड महामारीचा नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला. त्यामुळे बांधकामाचा वेग मंदावला आणि प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी वाढला. गुंतवणूक ही तीन कारणांनी वाढल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. कन्झुमर प्राईस इन्डेक्स (सीपीआय) वाढणे हे पहिले कारण तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होणे, हे दुसरे कारण आहे. भूमी अधिग्रहण कायदा-२०१३ मध्ये संशोधन झाल्यामुळे भूमी अधिग्रहणाची गुंतवणूक वाढणे, हे तिसरे कारण आहे. कंत्राटदारांना होणारे देय हे सीपीआयशी जुळले आहे. तर रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय देयसुद्धा वाढले आहे. तर नवीन कायद्यामुळे जमिनीची किंमत अडीच पट वाढली आहे.
गुंतवणूक वाढल्यानंतरही प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. कारण प्रकल्पाकरिता ५० टक्के फंडिंग युरोमध्ये होत आहे आणि युरोची किंमत रुपयाच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महामेट्रोला डीपीआरमध्ये नोंद असलेल्या रकमेतून जास्त रुपये जर्मनी आणि फ्रान्सकडून मिळेल. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासद्वारे त्यांच्या वाट्यातील ५५० कोटी रुपयाचे देय झालेले नाही. त्यामुळे तीन मेट्रो स्टेशन, डेपो आणि कर्मचारी क्वाॅर्टर आदींचे काम पूर्ण झाले नाही, असे अधिकारी म्हणाले.