नागपूर : लोकसभा निवणुकीच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. आजपासून दहा दिवसांनी नागपूर व रामटेकचा खासदार कोण याचा फैसला होणार आहे. मतमोजणी जसजसी जवळ येत आहे तसतशी उमेदवारांसह समर्थकांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे हे विजयाबद्दल आस्वस्त आहेत. तर नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्यासह रामटेकचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना यावेळी निश्चित परिवर्तन घडेल, याची खात्री आहे.
नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूरच्या लढतीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे. आ. विकास ठाकरे यांच्या रुपात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांने काँग्रेसचा किल्ला लढवला. नागपूरकर विकासाला पावती देतील. गडकरी हे गेल्यावेळपेक्षा जास्त मतांनी जिंकतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ठाकरे समर्थकही जोशात आहे. यावेळी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप विषयी नाराजी होती. मतदार शांत दिसत होता पण आतून धग कायम होती. त्यामुळे बाजी पलटेल व विकास ठाकरे बाजी मारतील, असा काँग्रेसजणांना विश्वास आहे.
मतदानानंतरचा पहिला आठवडा नेत्यांसह मतदारही शांत होते. पण दुसऱ्या आठवड्यात विजयाची समीकरणे मांडणे सुरू झाली. भाजप कार्यकर्ते सुरुवातीला काहीसे बॅकफूटवर दिसत होते. क्लोज फाईट होईल, असे दबक्या आवाजात मान्यही करीत होते. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते खूप जोशात दिसत होते. या आठवड्यात भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांचा कॉन्फीडन्स वाढलेला दिसला. आता भाजपकडून गडकरी दोन लाखांवर मतांनी जिंकतील, असा दावा केला जात आहे. भाजपचा हा दावा काँग्रेसच्या पचनी पडलेला नाही. यावेळी काँग्रेस नेते एकसंघ होते, कार्यकर्ते गल्लोगल्लीत सक्रीय होते. उत्साहाने बूथवर होते. मतदान काढत होते. त्यामुळे परिवर्तन घडेल, ठाकरे नक्कीच विजयी होतील यावर काँग्रेसजण ठाम आहेत.
पारवे- बर्वे समर्थक आक्रमकरामटेक मतदारसंघात एकामागून एक पोलिटिकल ड्रामा घडत गेला. तसतसी येथील निवडणूक आक्रमक होत गेली. मतदान तर शांततेत आटोपले पण दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांचा जोश आणि रोष अद्याप शांत झालेला नाही. रामटेकमध्ये यावेळीही राजू पारवे हेच भगवा फडकवतील, असा दावा भाजप-शिंदेसेनेकडून केला जात आहे. पारवे हे किमान एक लाख मतांनी विजयी होतील, अशी मतदारसंघनिहाय समीकरणे मांडली जात आहेत. तर दुसरीकडे बर्वे यांचे कार्यकर्तेही तेवढ्यात ताकदीने यावेळी रामटेकचा गड काँग्रेसच सर करेल, असा दावा करीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कडील कार्यकर्ते आपला उमेदवार पराभूत होऊ शकतो, हे ऐकूण घेण्यासही तयार नाहीत. विजयांच्या दाव्यांवरून ग्रामीण भागात आता तर तू-तू मै-मै होऊ लागली आहे.
बूथनिहाय मतदानावरून बांधले अंदाजदोन्ही मतदारसंघातील उमेदवारांसह त्यांच्या पक्षांनी मतदानाचा बूथनिहाय आढावा घेतला. कोणत्या बूथवर किती मतदान झाले, गेल्यावेळी आपल्याला किती मते मिळाली, कोणत्या गावात आघाडी-पिछाडीवर राहू याची सर्व गोळाबेरीज करण्यात आली. बूथ स्तरावरील कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, नेते यांचीही मते जाणून घेण्यात आली. या सर्वावरून विजयाचे अंदाज बाधले गेले आहेत. आता कुणाचे अंदाज सफल होतात आणि कुणाचे ‘हवा महल’ ठरतात, हे ४ जून रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.