नागपूर :
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) नागपूर येथे गुरुवार, १६ रोजी भारतीय महसूल सेवेच्या ७७ व्या तुकडीमधील ९० अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या सेवापूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेद्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. हे अधिकारी फील्ड ऑफिसमध्ये नियुक्त होण्यापूर्वी १६ महिन्यांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतात. ९० प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये ३५ महिला, २३ टक्के अधिकारी ग्रामीण भागातील आणि उर्वरित शहरी व निमशहरी भागातील आहेत. दोन तृतीयांश प्रशिक्षणार्थी अधिकारी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना आयकर कायदे, न्यायशास्त्र आणि व्यवसाय कायद्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर अधिकाऱ्यांना देशातील आयकर कार्यालयांमध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात येते.