नागपूर : अदानीच्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी ‘जेपीसी’ गठित करण्याची मागणी योग्यच आहे. आमच्या पक्षानेही त्याचे समर्थन केले आहे; परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची समितीसुद्धा प्रभावी आहे. यात अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समितीसुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी करू शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे सांगितले.
शनिवारी पवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाले, यापूर्वीही अनेक नेत्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाजपतर्फे गौरव यात्रा काढण्यात येत असल्याबाबत पवार म्हणाले, हा काही मोठा मुद्दा नाही. देशासमोर अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. लक्ष भरकटविण्यासाठी याला मुद्दा बनविण्यात आला आहे. पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्थन करीत त्यांच्या विचारात सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचेही सांगितले. रत्नागिरी येथील आपल्या घरच्या मंदिरात त्यांनी वाल्मीकी समाजाच्या व्यक्तीला पुजारी म्हणून ठेवले होते. तर गाय ही किती उपयुक्त आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आ. अनिल देशमुख, रमेश बंग उपस्थित होते. पवार यांनी यापूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
राजकारण्यांनी संयम पाळावा
छत्रपती संभाजीनगरात भडकलेल्या हिंसेबाबत शरद पवार म्हणाले की, जेव्हा धार्मिक विद्वेष पसरण्याची भीती असते तेव्हा राजकीय नेत्यांनी सावधगिरीने वक्तव्य करणे आवश्यक असते. त्यांनी राजकीय नेत्यांना संयम पाळण्याचा सल्लाही दिला. या घटनेचे स्वरूप जर धार्मिक आहे, तर ही चिंतेची बाब असल्याचे पवार म्हणाले.
विरोधी पक्षांच्या एकजुटीचा प्रयत्न, लवकरच बैठक
भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. यात अद्याप ठोस काही झालेले नाही. लवकरच विरोधी पक्षांची बैठक होईल. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ‘मिशन ४००’बाबत ते म्हणाले, ते प्रत्येक जागेवर दावा करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीत आहे; पण ही गोष्टी सार्वजनिक केली जात नाही.