सुमेध वाघमारे
नागपूर : मेयोतील डॉक्टरांना बाहेरून औषधी लिहून देताना स्वत:चा स्वाक्षरी सोबतच स्टॅम्प मारण्याचे निर्देश आहेत. परंतु हे टाळण्यासाठी काही डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातावर चक्क प्रीस्क्रिप्शन लिहून देत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. मेयो रुग्णालयातील औषधी तुटवड्याचा तिढा अद्यापही कायम असल्याचे यावरून दिसून येते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील औषधांची समस्या निकाली काढण्यासाठी हिवाळी अधिवेशनात स्थानिक पातळीवर औषधी खरेदीचे अधिकार १० टक्क्यांवरून ३० टक्के करण्यात आले. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील औषधांची समस्या सुटलेली नाही. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनन केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मेयोच्या परिसरात बेकायदेशीर औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पकडण्यात आले. त्याला तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिष्ठाता डॉ. संजय बिजवे यांनी या प्रकरणाचा चौकशीचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात अधिष्ठाता डॉ. बिजवे यांनी बाहेरून औषधी लिहून देण्यासाठी प्रीस्क्रिप्शनचा फॉर्मेट तयार केले. त्यावर संबंधित डॉक्टरांनी स्वाक्षरी व स्वत:चा स्टॅम्प मारण्याचे निर्देश दिले. मात्र बेकायदेशीर औषधांच्या विक्री प्रकरणामुळे फार कमी डॉक्टर असे प्रीस्क्रिप्शन लिहून देत आहेत. यावर पर्याय काढत काही डॉक्टर हातावरच औषधी लिहून देत असल्याचा प्रकार दोन मेडिकल स्टोअर्सने पुढे आणल्याने खळबळ उडाली.
-हातावरील प्रीस्क्रिप्शनवर औषधींसाठी दिला नकार
मेयो रुग्णालयासमोरील दोन मेडिकल स्टोअर्सने हातावर प्रीस्क्रिप्शन लिहून आलेल्या नातेवाइकांना औषधी देण्यास नकार दिला. जोपर्यंत कागदावर लिहून त्यावर स्वाक्षरी, शिक्का आणत नाही तोपर्यंत औषधी मिळणार नसल्याचेही औषधी दुकानदाराने बजावले.
-रुग्णांच्या नातेवाइकांनी जावे कुठे
प्राप्त माहितीनुसार, रुग्णांना रुग्णालयातून पाचपैकी तीन औषधी मिळत नसल्याचे वास्तव आहे. शासनाने स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याचे अधिकार वाढविले असले तरी वेळेत निधी देत नाही. दुसरीकडे अनेक रुग्णांकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने ते आयुष्यमान भारत योजनेत किंवा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत बसत नाही. अशा रुग्णांना बाहेरून औषधी लिहून दिल्यास आपल्या अडचणी वाढतील म्हणून यात न पडण्याचा मार्ग शोधत आहे. मात्र, औषधीअभावी कोणाचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.
-हातावर औषधी लिहून देणे हा प्रकार, धक्कादायक
रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्यास विहीत नमुन्यात प्रीस्क्रिप्शनवर औषधी लिहून देऊन त्यावर स्वत:ची स्वाक्षरी व स्टॅम्प मारण्याचा सूचना दिल्या आहेत. परंतु त्यानंतरही कोणी डॉक्टर हातावर औषधी लिहून देत असेल तर हा प्रकार धक्कादायक आहे. वैद्यकीय अधीक्षक यांना याबाबत निवासी डॉक्टरांना मार्गदर्शन करण्याचा सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात औषधी खरेदीचा वेग वाढविण्यात आला आहे.
-डॉ. संजय बिजवे, अधिष्ठाता मेयो