हिंगणा (नागपूर) : स्कूल ऑफ स्काॅलरची स्कूल बस वायसीसीई काॅलेजच्या गेटमधून बाहेर येताच चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झाली आणि राेडलगतच्या छाेट्या हाॅटेलमध्ये शिरली. यात हाॅटेलमध्ये बसून असलेले अभियांत्रिकीचे दाेन विद्यार्थी जखमी झाले असून, एका माेटरसायकलचे नुकसान झाले. ही घटना एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
नवनीत माधव ठाकरे व मानव राजेंद्र गाठीबांधे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. दाेघेही यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. ते या महाविद्यालयाच्या बाहेर राेडलगत असलेल्या छाेट्या हाॅटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले हाेते. त्यातच या महाविद्यालयाच्या गेटमधून स्कूल ऑफ स्काॅलरची एमएच-३१/सीबी-३५८१ क्रमांकाची स्कूल बस बाहेर आली आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ही अनियंत्रित स्कूल बस थेट राेडलगतच्या छाेट्या हाॅटेलमध्ये शिरली.
यात नवनीत ठाकरे व मानव गाठीबांधे गंभीर जखमी झाले. शिवाय, जवळच असलेल्या एका माेटरसायकलचेही नुकसान झाले. दाेघांनाही लगेच वानाडाेंगरी येथील शालिनीताई मेघे हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. स्कूल बसचालक प्रवीण लाकडे हा दारू पिऊन असल्याने हा प्रकार घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. स्कूल बसचालक प्रवीण लाकडे याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी प्रशिक बागडे यांच्या तक्रारीवरून प्रवीण लाकडे याच्या विराेधात गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.