नागपूर : गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या ‘रहाटेनगर टोली’ वस्तीत खुशाल ढाक या तरुणाने सुरू केलेल्या अभ्यासिकेचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अभ्यासिकेला भेट देण्यासाठी शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार थेट टोलीत पोहोचल्या. वस्तीमध्ये फिरून त्यांनी तेथील अवस्था बघितली. अशा अवस्थेत येथील मुलांसाठी खुशाल ढाक हा तरुण राबवत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुकही केले.
मांग गारुडी समाजाची वस्ती अख्ख्या शहरात प्रसिद्ध आहे. या वस्तीत दारूविक्री घराघरांत होते. वस्तीत पसरलेली घाण अस्वच्छता, येथील लोकांची अवस्था, मुलांच्या व्यथा शिक्षणाधिकारी यांनी वस्तीत फिरून बघितल्या. वस्तीत सुरू झालेल्या कॉन्व्हेंटला त्यांनी भेट दिली. ४ वर्षाच्या चिमुकल्याकडून एबीसीडी वदवून घेतली. वस्तीतील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवण क्लास बघितला. येथे काम करणाऱ्या मुलींशी चर्चा केली. अभ्यासिकेत भेट देऊन त्यांनी मुलांशी चर्चा केली. यावेळी मुलांनी त्यांना नृत्य करून दाखविले. वस्तीत शैक्षणिक उपक्रम राबवत असलेल्या खुशाल ढाक याच्यासोबत चर्चा करून त्याच्या कार्याचे कौतूक केले. यावेळी मदतीचा हातही त्यांनी या मुलांसाठी पुढे केला.