लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या कार्यरत काळात देण्यात आलेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीत उल्हास नरड यांच्यासह सहायक शिक्षण संचालक दिपेंद्र लोखंडे ( सदस्य सचिव ), तर सदस्य म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र पाटील, शिक्षण उपनिरीक्षक संजय बोदाडकर, अधीक्षक ( वेतन व भविष्य निर्वाह निधि पथक (मा), वर्धा) ज्ञानेश्वर जवादे,कनिष्ठ लेखा परिक्षक, लेखाधिकारी ( शिक्षण विभाग, चंद्रपूर) प्रमोद दांडगे, आणि कनिष्ठ लेखा परिक्षक, लेखाधिकारी, ( शिक्षण विभाग, नागपूर ) प्रकाश देव्हारे आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे लोकमत ने शिक्षण विभागात तत्कालीन शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षरीने नियुक्त्या करण्यात आल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी नैताम हे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असतांनाचे कालावधीत त्यांनी किती वैयक्तिक मान्यता प्रदान केलेल्या आहेत. त्या मान्यता प्रकरणाची यादी व प्रकरणाच्या मुळ नस्त्या तपासणीकरिता पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सिध्देश्वर काळुसे यांना दिले होते. तसेच याबाबत अहवाल मागितला होता. परंतु त्यांनी या बाबत पाठविलेल्या अहवालातील अभिप्राय त्रोटक असल्याने कोणतीही कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी नैताम यांच्या कार्यरत कालावधीत देण्यात आलेल्या सर्व मान्यता प्रकरणांचा तपास करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीत काय पुढे येते याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.