नागपूर : नाशिक येथील दुर्घटनेनंतर नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) खासगी बसेसची तपासणी मोहीम सोमवारपासून हाती घेतली. यात एका बसमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी असलेला दरवाजाच उघडत नसल्याचे दिसून आले. यामुळे आगीची घटना घडल्यास प्रवाशांचा जीव जाणार नाही तर काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिक येथे खासगी बस आणि टँकरच्या अपघातानंतर लागलेल्या आगीत बसमधील ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. बसचा प्रवास सुरू होण्यापूर्वी सर्व खासगी बसचालकांना ‘पब्लिक ॲड्रेसस् सिस्टीम’ वापरण्याच्या सूचना आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, आपत्कालीन दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा वापर किंवा ब्रेकेबल काच असल्यास ते फोडण्यासाठी लागणाऱ्या हातोडीचा वापर कसा करावा, त्या हातोडीची जागा, वाहनातील अग्निशमन उपकरणांची जागा, त्याच्या उपयोगाचीही माहितीच दिली जात नसल्याने आपत्कालीन स्थितीत सुखरूप बाहेर पडणे सहज शक्य असले तरी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. यावर ‘लोकमत’ने १० ऑक्टोबरच्या अंकात ‘...तर अनेक ट्रॅव्हल्समध्ये मृत्यूचे तांडव’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत ‘आरटीओ’ने सोमवारी खासगी बसची तपासणी मोहीम हाती घेतली. यात एका बसमध्ये आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणारी यंत्रणाच नसल्याचे पाहताच आरटीओ पथकालाही आश्चर्य वाटले. अधिकाऱ्यांनी ही बसच जप्त केली.
प्रत्येकाला ठोठावला दंड
आरटीओच्या तपासणी मोहिमेत १९ खासगी बसमध्ये किरकोळ त्रुट्या आढळून आल्या. मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहड यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या बसेसमध्ये आग विझविण्याची यंत्रणा, आपत्कालीन दरवाजा व पॅनिक बटनची सोय होती; परंतु बसचालकाने गणवेश धारण केलेला नव्हता आणि त्यांचा बॅच दिसत नव्हता. यामुळे प्रत्येकी बसवर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहड, विजय राठोड व सहायक मोटार वाहन निरीक्षक ध्वज दकणे यांनी केली.
- दोषी बसेसवर कठोर कारवाई
प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या सर्व खासगी व शासकीय बसची तपासणी आरटीओचा वायुवेग पथकाकडून वेळोवेळी केली जाते; परंतु आता ही तपासणी नियमित केली जाणार आहे. यात दोषी आढळून येणाऱ्या बसेसवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
- रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी