नागपूर : देशात भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधे जीवन जगल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.
सार्थक फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. सुनील केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग, सत्कारमूर्ती वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट डॉ.अमित समर्थ, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, संजय पालीवाल, राजाभाऊ टाकसाळे, सुधीर बाहेती, पंकज महाजन, अजय मल उपस्थित होते. राज्यपाल पुरोहित यांनी नागपूरची संस्कृती सर्व समावेशक असून, नागपूर हे मिनी इंडिया असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते गिरीश गांधी, डॉ.अमित समर्थ, विष्णू मनोहर, रवींद्र कासखेडीकर यांचा शाल, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महेश बंग यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सार्थकचे सचिव विनोद चतुर्वेदी यांनी केले. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार पंकज महाजन यांनी मानले.