गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाची (ब्लॅक राइस) लागवड केली. भरघोस उत्पन्नही आले. मात्र, बाजारपेठेचे अज्ञान आणि यात प्रशासनाने लक्ष न घातल्याने ग्राहक मिळाले नाही. शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. परिणामत: वर्षभरातच शेतकऱ्यांनी या प्रजातीच्या तांदळाची लागवडच बंद केली. या उत्पादनातून समृद्ध होण्याची संधी शेतकऱ्यांच्या दारी आली होती, मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांच्यावर निराशेची पाळी आली. नागपूर आत्मा प्रकल्पाच्या पुढाकारात सेंद्रिय शेती बचत गटाच्या माध्यमातून काळ्या तांदळाच्या लागवडीचा हा प्रयोग करण्यात आला होता. प्रारंभी २०१८ मध्ये प्रकल्पाने ७०० क्विंटल बिजाई मागवून उमरेड, रामटेक, कामठी, मौदा, पारशिवणी, कुही, भिवापूर या सात तालुक्यांत कार्यरत असलेल्या शेतकऱ्यांच्या सेंद्रिय गटांना प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी दिली. ७० एकरांत झालेल्या लागवडीत एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पन्न आले होते. सरासरी ८४० ते १०५० क्विंटल उत्पन्न मिळाले होते. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला. २०१९ मध्ये १२७ एकरांवर हा तांदूळ पिकविण्यात आला, उत्पन्नही चांगले आले. कृषी महोत्सवात या तांदळाची विक्री करून तात्पुरता बाजारपेठेचा प्रश्न सोडविला गेला.
तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रयोगाची दखल घेतली. विदर्भ व मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. बाजारपेठेची आखणीही झाली. मात्र, पुढे काही महिन्यांतच मुद्गल यांची बदली झाली. त्यानंतर हा विषय दुर्लक्षित झाला. पुढे कुणीच दखल घेतली नाही.
फारसा प्रचार न झाल्याने आणि शेतकऱ्यांनी किंमत २०० ते ३०० रुपये किलो ठेवल्याने ग्राहक फारसे मिळत नव्हते. उत्पन्न झालेल्या धानाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. दरम्यान, येथील उत्पादनाची आणि बाजारपेठेअभावी पडलेल्या संभ्रमाची माहिती व्यापाऱ्यांना कळली. त्यांनी मिळेल त्या दामाने हे धान खरेदी करून बिजाई म्हणून परप्रांतात विकले.
काळ्या तांदळावर जर्मनीत संशोधन
‘फॉरबिडन राइस’ अशी पाश्चात्त्य देशात ओळख असलेल्या या तांदळावर जर्मनीत संशोधन झाले. त्यात कॅन्सर प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. हा तांदूळ रोगप्रतिकारक असून शरीरातील विषारी द्रव्य नाहीशी करतो. बद्धकोष्ठता दूर करतो. मधुमेह, लठ्ठपणावरही गुणकारी असल्याबाबत जर्मनीतील संशोधनाची नोंद कृषी विज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहे.
अपयशाची ही आहेत कारणे
- शेतकऱ्यांचा २०० ते ३०० रुपये किलो असा अवाजवी दराचा आग्रह नडला
- बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यंत्रणेला अपयश
- आत्मा प्रकल्पाच्या प्रयोगाची फारशी दखल झाली नाही
- औषधी गुणधर्म लोकांना सांगण्यात यंत्रणा मागे पडली
- प्रचार, प्रसाराच्या दृष्टीने नियोजन झाले नाही
वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये आम्ही या तांदळाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. प्रतिसादही चांगला होता. मात्र, विक्रीचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांनी लागवड बंद केली.
- नलिनी भोयर, प्रकल्प अधिकारी, आत्मा, नागपूर