निशांत वानखेडे
नागपूर : साैरऊर्जा, पवन ऊर्जा, जलऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आता भू-औष्णिक (जीओथर्मल) ऊर्जेची भर पडणार आहे. भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी ठरला असून, वैज्ञानिकांना दिल्ली येथे ५ किलाेवॅट वीज तयार करण्यात यश आले आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे जगातील भू-औष्णिक ऊर्जा तयार करणाऱ्या देशात आता भारताचेही नाव नाेंदविले जाणार आहे.
दिल्ली येथे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत डाॅ. मनमाेहन कुमार व डाॅ. भूपेश शर्मा यांच्या नेतृत्वात पायलट प्राेजेक्ट राबविण्यात आला. संस्थेचे वैज्ञानिक भूपेश शर्मा यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना या प्रकल्पाची माहिती दिली. जीएसआय आणि ओएनजीसीच्या संशाेधकांनी आपल्या देशात भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे निघणारी १०० पेक्षा अधिक ठिकाणे शाेधली आहेत. खरे तर ही स्थळे ऊर्जेचे श्रीमंत स्रोत आहेत, पण बिनकामी पडले आहेत. त्या उष्ण पाण्याच्या नैसर्गिक स्रोताद्वारे वीजनिर्मिती हाेऊ शकते, ही दिशा भारतीय भू सर्वेक्षण (जीएसआय), नागपूरचे संचालक व भूवैज्ञानिक डाॅ. विशाल साखरे व त्यांच्या टीमने दाखविली आणि ती भू-औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाची ठरली. भारतीय काेळसा मंत्रालयाने या पायलट प्राेजेक्टसाठी १.७ काेटी रुपये मंजूर केले. अडीच हजार चाैरस फूट जागेत वैज्ञानिकांनी तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून ५ किलाेवॅट वीजनिर्मितीचा प्रयाेग यशस्वी केला. यावेळी नवीन व नविनीकरण ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव ललित बाेहरा, डाॅ. साखरे, श्रीराम संस्थेचे संचालक डाॅ. मुकुल दास व इतरांच्या उपस्थितीत भू-औष्णिक ऊर्जेपासून दाेन बल्ब पेटवून हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. लवकरच डिसेंबर-जानेवारीमध्ये तेलंगणा राज्याच्या मनुगुरू येथे भू-औष्णिक स्रोताद्वारे २० किलाेवॅट वीजनिर्मिती करून व्यावसायिक सुरुवात करण्यात येणार असल्याचे भूपेश शर्मा यांनी स्पष्ट केले.
अशी झाली वीजनिर्मिती
पाण्याचा उष्णांक बिंदू (बाॅइलिंग पाॅइंट) १०० डिग्री असताे. मात्र वैज्ञानिकांनी ६५ ते ७० डिग्री उष्ण पाण्यातून वीजनिर्मिती केली. या उष्ण झऱ्यातून उष्णता (हीट) बाहेर काढण्यात आली. टर्बाईनमध्ये या उष्णतेसाेबत एक विशिष्ट लिक्विडमिश्रित करून त्याद्वारे वाफ तयार करण्यात आली. ही वाफ पुन्हा लिक्विडमध्ये परिवर्तीत करण्यात आली. हे चक्र सतत सुरू ठेवत वीजनिर्मिती करण्यात आली. देशातील विविध स्रोतांमधून १५ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती करून मुंबई, दिल्लीसारख्या शहरांची वर्षभराची विजेची गरज पूर्ण केली जाऊ शकते, असा विश्वास भूपेश शर्मा यांनी दिला.
या पाच देशांची मक्तेदारी
भू-औष्णिक स्रोतातून वीजनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, आयलॅंड, फिलिपिन्स, इंडाेनेशिया व मेक्सिकाेचा समावेश आहे. यासह न्यूझिलॅंड, इटली, तुर्की, एल साल्वादोर, केनिया या देशांचाही समावेश आहे. आयलॅंडमध्ये ९० टक्के गरज भू-औष्णिक ऊर्जेने भागविली जाते.
हा पहिला प्रयाेग यशस्वी ठरला आहे. लवकरच तेलंगणाच्या मनुगुरू येथे २० किलाेवॅट विजेची निर्मिती करून व्यापक स्तरावर पाऊल टाकले जाणार आहे. यामुळे भू-औष्णिक ऊर्जा क्षेत्रात जगाच्या नकाशात भारताचे नाव नाेंदविले जाणार आहे. याद्वारे २०३० पर्यंत अपारंपरिक स्रोतापासून ५० टक्के वीजनिर्मितीचे ध्येय पूर्ण करण्याकडे हे ऐतिहासिक पाऊल आहे.
- डाॅ. विशाल साखरे, संचालक (भू-औष्णिक विभाग), जीएसआय, नागपूर