मेहा शर्मा
नागपूर : अपघाताने चाललेल्या बंदुकीच्या गाेळीने गंभीर जखमी झालेल्या पाेलीस जवानाचा चेहराही विद्रुप झाला हाेता. शहरातील प्लास्टिक सर्जनच्या पथकाने आठ तास यशस्वी शस्त्रक्रिया करून न केवळ जवानाचे प्राण वाचविले, तर त्यांचा कुरूप झालेला चेहराही स्वरूप करून दिला. ऑरेंज सिटी हाॅस्पिटल अणि संशाेधन संस्था (ओसीएचआरआय) च्या डाॅक्टरांनी जवानाच्या चेहऱ्यावर ५ ते ६ शस्त्रक्रिया करून ताे सुस्थितीत आणला.
नक्षलविराेधी पथकात कार्यरत या जवानाच्या बंदुकीतून अचानक गाेळी सुटली. वेगाने सुटलेली ही बुलेट दाढेतून आत शिरली आणि जीभ व टाळूला फाडत नाकाच्या पाेकळीतून डावा डाेळा व मस्तकाला छेदत बाहेर निघाली. या अपघाताने जवानाचे ताेंडच नाही, तर नाकाच्या हाडाचे तुकडे झाले आणि डाेळाही कायमचा निकामी झाला. दाढेचे, जीभेचे आणि टाळूच्या हाडाचेही तुकडे पडले. या बुलेटने त्यांच्या चेहऱ्याचा एक भाग अक्षरश: छिन्नविच्छिन्न झाला हाेता. अशा अतिशय गंभीर आणि विदारक अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अशा अवस्थेत रुग्णातील प्लास्टिक सर्जन डाॅ. दर्शन रेवनवार, मेंदू शल्यचिकित्सक डाॅ. पलक जैस्वाल, नेत्रतज्ज्ञ डाॅ. अभय आगाशे, जनरल सर्जन डाॅ. डी. काने, ईएनटी सर्जन डाॅ. सिद्धार्थ सावजी यांच्या पथकाने उपचार सुरू केले. जवानावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जीवही वाचला आणि रुपही मिळाले
डाेळ्याच्या बाहुल्या काढण्यात आल्या, मेंदूमधील हाडाचे तुकडेही काढण्यात आले. ड्यूराेप्लास्टी करून डाेळ्याच्या पापण्या, पॅलेट्सला पूर्वस्थितीत आणण्यात आले. कृत्रिम बाहुल्या डाेळ्यामध्ये लावण्यात आल्या. त्यांचा विद्रुप झालेल्या चेहरा सुस्थितीत आणण्यासाठी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. डाॅक्टरांच्या प्रयत्नाने जवानाचा जीवही वाचला आणि रूपही मिळाले आहे.
डाॅ. दर्शन रेवनवार म्हणाले, रस्ते अपघात, जळलेले किंवा ॲसिड हल्ला झालेल्या व्यक्तीने थेट प्लास्टिक सर्जनकडे जाणे आवश्यक आहे. मात्र, माहितीच्या अभावाने लाेक जनरल फिजिशियनकडे जातात. उंचावरून पडले, डाेक्याला मार लागला तरीही लाेकांनी प्रथम प्लास्टिक सर्जनचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जखमेचे याेग्य व्यवस्थापन करता येते.
साधा चिरा जरी पडला असेल तर जनरल फिजिशियनकडून टाके लावले जातात. त्यामुळे अनेक मार्क लागलेले असतात व भविष्यात त्यामुळे निराशा येण्याची शक्यता असते. योग्यवेळी त्वरित हस्तक्षेप, बहु-अनुशासनात्मक दृष्टिकोन आणि पद्धतशीर चरण-दर-चरण उपचार केल्याने अशा रुग्णांचा जीव तसेच पीडिताचा चेहरा वाचवण्यासाठी आवश्यक असल्याचे डाॅ. रेवनवार म्हणाले.
रुग्णालयाचे संचालक डाॅ. अनुप मरार म्हणाले, या प्रकरणात रुग्णाला ५ डिसेंबर राेजी गडचिराेलीवरून आणण्यात आले हाेते. ते आमच्याकडे महिनाभर हाेते. या काळात त्यांच्यावर विविध प्रकारच्या ५ ते ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांचा उपचार महाराष्ट्र पाेलीस कुटुंब कल्याण याेजनेअंतर्गत झाला. अशा रुग्णांना मानसिक धक्का लागण्याचीही शक्यता असते. अशावेळी याेग्य समुपदेशन आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.