नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्येला १७ दिवस झाले असून अद्यापही त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. जबलपूर पोलिसांना हरदा नदीजवळील एका विहिरीत सना यांच्यासारख्या वर्णनाचा मृतदेह आढळला आहे. मात्र संबंधित मृतदेह सना यांचा नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सना यांच्या पायाची बोटे आणि नखे यांचे वर्णन त्या मृतदेहाशी जुळत नसल्याचे त्यांची आई मेहरुनिस्सा खान यांनी म्हटले आहे.
सना खान यांचा अमित साहूने १ ऑगस्टच्या सकाळी खून केला होता व त्यानंतर मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह हिरन नदीत फेकला होता. तेव्हापासून सना यांच्या मृतदेहाचा शोध लागलेला नाही. नागपूर पोलिस व जबलपूर पोलिसांच्या पथकाने अमित साहूला अटक केल्यानंतर त्याने सना यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर युद्धपातळीवर मृतदेहाचा शोध सुरू झाला. अगदी चारशे किलोमीटर अंतरापर्यंत शोधपथकाने नदीत मृतदेह शोधला. मात्र तो सापडला नाही.
दरम्यान शिराली तहसीलच्या एका विहिरीत सना यांच्या वर्णनाशी मिळताजुळता मृतदेह आढळला होता. पोलिसांनी त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून सना यांच्या कुटुंबीयांना मृतदेह दाखविण्यात आला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने चेहरा ओळखणे शक्य झाले नाही. मात्र नातेवाइकांनी मेहरूनिस्सा यांना मृतदेहाचे फोटो पाठविले होते. त्यात पायाचे बोट लहान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सना कधीही नख वाढवत नव्हती व तिला नखं चावून खाण्याची सवय होती. मात्र मृतदेहाच्या हाताची नखे वाढलेली दिसून येत आहे. तिच्या हातात केवळ घड्याळ असायचे. ती कुठलाही धागा वगैरे बांधत नव्हती. त्यामुळे तो तिचा मृतदेह नाही असेच आम्हाला वाटत असल्याचे मेहरूनिस्सा यांनी सांगितले.
अमित साहूला राजकीय पाठबळ
प्रसारमाध्यमांशी बोलताना मेहरुनिस्सा खान यांनी आरोपी अमित साहूला राजकीय पाठबळ असल्याचा दावा केला. मध्य प्रदेशमधील आमदार संजय शर्मा याच्या साळ्यासोबत मिळून अमितने अगोदर एक हत्या केली होती. त्या प्रकरणातच त्याला शिक्षा झाली असती तर आज ही वेळ आली नसती. या प्रकरणातदेखील त्याला वाचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र नागपूर पोलिसांनी तेथे जाऊन तपास केल्याने वास्तव समोर आले. सनाच्या हत्येचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, अशी मागणी मेहरुनिस्सा खान यांनी केली आहे.