नागपूर : ज्या प्रियकरासोबत ‘तेरे मेरे सपने’ सजवत लग्नाचे स्वप्न रंगविले, मात्र त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली अन् ‘हमारी अधुरी कहानी’ असे म्हणत तरुणीने आपला जीव दिला. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने उच्चशिक्षित तरुणी तणावात गेली अन् त्या तणावातून तरुणीने आत्महत्या केली. दीक्षा (२८) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
दीक्षा व तिचा प्रियकर अजय हे दोघेही एकाच महाविद्यालयात कार्यरत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. महाविद्यालयातदेखील अनेकांना याची माहिती होती. लवकरच हे लग्न करतील, असाच अनेकांचा अंदाज होता. त्यांनी लग्नाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या. दीक्षाने घरच्यांना प्रेमाची माहिती दिली. मात्र तिच्या कुटुंबीयांनी अगोदर लग्नाला नकार दिला होता. मात्र तिची जिद्द व प्रियकरावरील विश्वास लक्षात घेता त्यांनी परवानगी दिली. मात्र ज्यावेळी तिचा प्रियकर अजयने त्याच्या घरी ही माहिती दिली तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना ‘परंपरा, प्रतिष्ठा’ आठवली व त्यांनी लग्नाला परवानगी नाकारली. अजयनेदेखील घरच्यांच्या विरोधात न जाण्याची भूमिका घेतली.
ज्या प्रियकरावर स्वत:हून जास्त विश्वास ठेवला व प्रसंगी घरच्यांशी संघर्ष केला त्याने ऐनवेळी साथ देण्यास नकार दिल्याने दीक्षा कोलमडली. ती त्यानंतर सातत्याने तणावातच होती. अखेर तिने शनिवारी तिच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने तिच्या मनातील सल चिठ्ठीतून व्यक्त केली. तिच्या मृत्यूची बातमी कळताच प्रियकर हमसून हमसून रडला. मात्र उशीर झाला होता. एका नकारामुळे प्रेमकहाणीसोबतच एका निष्पाप तरुणीचा जीव गेला होता. या प्रकरणात शांतीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.