वडिलाचा मुलास खलनायक ठरविण्याचा प्रयत्न फसला; हायकोर्टाने पोटगीची मागणी फेटाळली
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 2, 2023 03:09 PM2023-10-02T15:09:12+5:302023-10-02T15:09:26+5:30
माझ्याकडे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत नाही. त्यामुळे मोठ्या मुलाकडून पोटगी मिळवून द्या, असे वडिलाचे म्हणणे होते.
नागपूर : विविध खोटे आरोप करून मुलाला खलनायक ठरविण्याचा वडिलाचा प्रयत्न फसला. त्यामुळे वडिलाला पोटगी नाकारण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला.
वडिलाने मोठ्या मुलावर गंभीर आरोप केले होते. लहान मुलाची मन:स्थिती असामान्य असल्यामुळे तो माझी देखभाल करू शकत नाही. मोठा मुलगा सामान्य आहे, पण तो देखभालीची जबाबदारी टाळत आहे. त्याने मला घराच्या बाहेर काढले. माझ्या नावावरील चार भूखंड विकून त्याचे लाखो रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. माझ्याकडे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत नाही. त्यामुळे मोठ्या मुलाकडून पोटगी मिळवून द्या, असे वडिलाचे म्हणणे होते. परंतु, त्यांनी यासंदर्भात ठोस पुरावे सादर केले नाही. परिणामी, त्यांचे आरोप सिद्ध होऊ शकले नाही. याउलट मुलाने सादर केलेल्या पुराव्यांवरून वडील खोटे बोलत असल्याचे उच्च न्यायालयाला दिसून आले. परिणामी, वडिलाला दणका बसला. सुरुवातीस कुटुंब न्यायालयाने २ मे २०२३ रोजी वडिलाचा पोटगीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या मुद्यांमुळे डाव उलटला
वडील लहान मुलासोबत राहत असून लहान मुलाची पत्नी किराना दुकान चालविते. वडील उदबत्तीचा व्यवसाय करतात. याशिवाय, त्यांना दर महिन्याला १५ हजार रुपये भाडे मिळते. त्यांनी आयकर भरताना तीन लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्न दाखविले आहे. पत्नीच्या नावाने ८ लाख १० हजार रुपयाची मुदत ठेव केली आहे. २०१९ मध्ये सोलर सिस्टमसाठी दोन लाख रुपये खर्च केले आहेत. २०१२ मध्ये मोठ्या मुलाने त्यांना ५० लाख रुपये दिले व सर्व दागिने परत केले. २०१३ मध्ये त्यांच्यावरील हृदय शस्त्रक्रियेचा खर्चही केला. ते केवळ लहान सुनेच्या चिथावणीवरून मोठ्या मुलाच्या विरोधात वागत आहेत, या मुद्यांमुळे वडिलावरच डाव उलटला.