कोराडी (नागपूर) : जगभरात साजरे होत असलेल्या ‘डे’ संस्कृतीपासून आता भारतही अलिप्त राहिलेला नाही. त्यामुळे नित्यनेमाने कोणते ना कोणते दिवस साजरे होतच असतात. प्रासंगिकतेनुसार काही दिवसांचे औचित्या साधून त्या दिवसांचे सोहळे, सत्कार, जनजागरण शासकीय स्तरावरही साजरे केले जातात. ‘जागतिक महिला दिन’ हा त्यापैकीच एक असा महत्त्वाचा दिवस.
महिला सुरक्षा, महिला विकास, महिला सक्षमीकरण आदी विचारांच्या दृष्टिकोनातून हा दिवस शहरात वेगवेगळ्या स्तरावर साजरा होतो; परंतु ‘महिला दिना’चे महत्त्व आणि त्याअनुषंगाने होणारे जागरण तळागाळातील, वंचित स्थितीतील आणि ‘पोटाची भूक’ या अवस्थेच्या पलीकडे न गेलेल्या मजुरांपर्यंत पोहोचले का, हा एक प्रश्न आहे. असाच प्रश्न कोराडी विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणाऱ्या महिला मजुरांनी उपस्थित केला आणि महिला दिन अजूनही वंचित अवस्थेतच असल्याचे भान आले.
शताब्दी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर कोराडी विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात साजरा करण्यात आला. या विभागात अगदी शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या महिला कामगारांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन व शाल पांघरूण करण्यात आला. आपला हा सत्कार ‘कशासाठी’, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता आणि जेव्हा उत्तर मिळाले ‘महिला दिनामुळे’ तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ‘महिला दिन म्हणजे काय जी’ असा प्रश्न उपस्थित करून त्या गहिवरल्या आणि त्यांच्या गहिवरण्यातच त्यांच्या अवस्थेचे चित्रण प्रकट झाले.
कोळसा डोक्यावर उचलून ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे जोखमीचे काम त्या करतात. मुलांचे तर सोडाच स्वत:कडे लक्ष पुरविण्याचा वेळ त्यांच्याजवळ नसतो. यावेळी त्यांना धीर देण्यात आला आणि त्यांच्या व्यथा समजून घेण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप रंगारी, आशिष जरवार, निकेश राऊत, बिट्टू खंगारले यांनी राधिका सोनवणे, कांताबाई नागपुरे, धनश्री यादव, गया शाहू, भुलेश्वरी उके, लीला निशांत, देवकी छत्री, सुहानी बघिले, उर्मिला सहारे, अनिता सोनवणे, लीलाबाई चौधरी, दुलेश्वरी निशांत, बेबी कुंभरे, राधा यादव, सुखमती यादव, ममता ठाकूर, उमा इंगळे, पार्वती मेश्राम, मिलाया चव्हाण या महिला कामगारांचा सत्कार केला.