नरेश डोंगरे नागपूर : येथील विमानतळाच्या रन-वे वर विमानाचे लॅण्डिंग करण्याऐवजी एका लेडी पायलटने भरकटलेले विमान चक्क मिहानमधील 'टॅक्सी वे'वर उतरवले. गोंदिया आणि नागपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेने विमानतळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
इंदिरा गांधी उड्डाण अकादमीच्या एका महिला पायलटने मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून नागपूर विमानतळाकडे झेप घेतली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर या छोट्या प्रशिक्षण विमानाला काही वेळेनंतर परत गोंदिया विमानतळावर जायचे होते. दरम्यान, एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी)शी या विमानाचा संपर्क तुटला. त्यामुळे एटीसीने हे विमान नेमके कुठे आहे, याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, भरकटलेले हे विमान चालविणाऱ्या महिला पायलटने दुपारी १ च्या सुमारास विमानतळालगतच्या मिहान - सेझ परिसरातील एमआरओला लागून असलेल्या 'टॅक्सी वे'वर लॅण्ड केले. सुदैवाने टॅक्सी वे गुळगुळीत असल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, प्रशिक्षण देणारे विमान भरकटल्याचे लक्षात येताच संबंधित यंत्रनेत प्रचंड खळबळ निर्माण झाली. दुपारी १ च्या सुमारास भरकटलेल्या विमानाच्या शोधातील अधिकाऱ्यांना एअरपोर्टच्या रन-वे ऐवजी हे विमान भलतीकडेच मात्र सेफ लॅण्ड झाल्याचे कळाले आणि त्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. दुपारी ३.३० च्या सुमारास अन्य एका विमानाने फ्लाईंग क्लबचे अधिकारी नागपुरात पोहचले आणि त्यांनी महिला पायलटशी संपर्क करून माहिती जाणून घेतली. त्यानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास तिला घेऊन ते गोंदियाला निघून गेले. अन्य एका पायलटने रात्री ८ च्या सुमारास टॅक्सी वे वर उतरलेल्या विमानासह पुन्हा गोंदियाकडे झेप घेतली.
गोंदियाचे फ्लाईंग क्लब अन् दुर्घटना
मार्च २०२३ मध्ये गोंदियाच्याच दुसऱ्या फ्लाईंग क्लबचे एक विमान बालाघाट जिल्ह्यातील किरणापूरजवळ एका पर्वताला धडकले होते. त्या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला होता. तर, २०१७ मध्ये गोंदियाच्याच अन्य एका फ्लाईंग क्लबचे विमान वैनगंगा नंदीत कोसळले होते. त्यात पायलटसह प्रशिक्षकाचाही मृत्यू झाला होता.
एएआय, एमआयएलकडून रिपोर्ट तयार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ निदेशक आबिद रुही (एमआयएल) यांनी या घटनेच्या संबंधाने सांगितले की, या प्रकाराचा अहवाल (रिपोर्ट) तयार करण्यात आला असून तो डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एविएशन यांना पाठविण्यात आला आहे. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे महाप्रबंधक (समन्वय) जी. के. खरे यांनी सांगितले की त्यांनी असाच अहवाल एएआयच्या मुख्यालयाला पाठविला आहे.