नागपूर : शुक्रवारी एकाच दिवशी शहरात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस क्वॉर्टर, बिनाकी मंगळवारी येथील लाकडाचे टाल, इतवारी भागातील नमकगंज येथील स्टोअर रुम, अजनी भागातील मेडिकल स्टोअर्स तसेच कांजी हाऊस येथील आरामशीनला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शुक्रवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास पोलीस क्वॉर्टरच्या पाचव्या मजल्यावरील पोलीस अधिकारी ढोबळे यांच्या फ्लॅटमध्ये आग लागली. दूरवरून ही आग दिसत होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत ढोबळे यांच्या फ्लॅटमधील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले.
दुसरी घटना अजनी भागात सकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास घडली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोरील आशा मेडिकल स्टोअर्सला लागलेल्या आगीत दीड लाखाचे नुकसान झाले. तिसरी घटना दुपारी २ च्या सुमारास इतवारी भागातील नमकगंज येथे घडली. तुळशीराम उमरेडकर यांच्या छतावरील स्टोअर रुमला आग लागली. ही आग बाजूच्या आत्माराम टॉवर इमारतीत पसरली. भीषण आगीमुळे बघ्याची गर्दी जमली होती. आगीत डॉ. श्याम छाडी यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी गंजीपेठ व सिव्हील लाईन येथील अग्निशमन केंद्रातील चार गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. सायंकाळी ६ च्या सुमारास कांजी हाऊस येथील आरामशीनला शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.