प्रवीण खापरे / विशाल महाकाळकर
नागपूर : सीताबर्डी, झांशी राणी चौकात असलेल्या माहेश्वरी सभागृहात २६ जानेवारीपासून सुरू असलेल्या देश- विदेशातील प्राचीन व अर्वाचीन नाणी व चलनांच्या प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. या प्रदर्शनात प्राचीन भारतातील पहिले नाणे व विदर्भ जनपदात वैनगंगेच्या खोऱ्यात तयार करण्यात आलेल्या नाण्याने भारताच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यास बाध्य केले.
या प्रदर्शनात अडीच हजार वर्षांपूर्वी चलनात वापरण्यात आलेल्या पहिल्या नाण्यांसोबतच भारतात अस्तित्त्वात असलेल्या १६ महाजनपदांतील २३ जनपदांमध्ये प्राचीन काळात व्यवहारात असलेली नाणी सादर करण्यात आली होती. यासोबतच देश- विदेशातील प्राचीन नाण्यांसोबतच ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी, इंग्रज, इंग्लंड, फ्रान्स, श्रीलंका आदी देशांतील नाणी आणि नोटा, जुने व नवे धनादेश (चेक), स्टॅम्प पेपर्स आदींचा समावेश या प्रदर्शनात होता. याच प्रदर्शनात जगातील सर्वांत मोठे नाणे संग्राहक असलेले नागपूरच्या न्युमिस्मॅटिक आर्ट गॅलरीचे सोहम रामटेके यांनीही आपला नाणे संग्रह सादर केला होता. त्यात भारतात चलनात प्रथम वापरण्यात आलेले नाणे होते. हे नाणे ख्रिस्तपूर्व सहावे शतक (अडीच हजार वर्षांपूर्वी) गांधार जनपदाचा राजा पुष्करसीन याने तयार केले होते. पुष्करसीनने सहा शस्त्रांचे प्रतिक व सहा पाकळ्यांचे प्रतिक, अशी दोन नाणी तयार केली होती. त्यानंतर भारतात आणि भारतात आलेल्या परकियांनी आपल्या देशांमध्ये चलनात नाणे वापरण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यासोबतच ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकात विदर्भ जनपदात तत्कालीन राजाने एक नाणे चलनात सुरू केले होते. हे नाणे वैनगंगा नदीत सापडले होते. या नाण्यावर हत्ती हा प्रतिक म्हणून वापरण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर गुप्त काळात तयार करण्यात आलेले सुवर्णनाणेही सोहम यांनी येथे सादर केले. हे भारतातील पहिले सोन्याचे नाणे असल्याचे सांगितले जाते, असे सोहम यांनी सांगितले. केवळ १६ दिवसांचे राज्य असलेल्या अजिम उस शान या मोघल शासकाचे नाणेही या प्रदर्शनात होते.
३० लाखांवर नाण्यांचा संग्रह
- सोहम रामटेके यांच्या न्युमिस्मॅटिक आर्ट गॅलरीमध्ये ३० लाखांवर नाण्यांचा संग्रह असून, त्यांचे वडील गेल्या ४५ वर्षांपासून हा संग्रह करत आहेत. त्यांच्याकडे जगातील लहान- मोठे देश व प्राचीन काळातील साम्राज्य, असे मिळून अडीचशेहून अधिक साम्राज्यांची नाणी आहेत.
दक्षेस ठरला सर्वांत लहान नाणे संग्राहक
- सातव्या वर्गात शिकणारा १३ वर्षीय दक्षेस मून हा या प्रदर्शनातील सर्वांत लहान वयाचा नाणे संग्राहक होता. त्याच्याजवळ १०० नाण्यांचा संग्रह आहे.