नागपूर : शनिवारी थर्टी फर्स्ट नाईटचा जल्लोष झाल्यानंतर रविवारी २०२३चा पहिला दिवस होता. भारतीय परंपरेनुसार शुभकार्याचा प्रारंभ देवाचे दर्शन घेऊन केला जातो. त्या अनुषंगाने ‘वर्षाचा पहिला दिवस देवाला’ म्हणत नागपूरकरांनी शहरातील प्रमुख देवस्थानांमध्ये दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. जणू देवस्थानांमध्ये यात्राच भरली की काय, असा भास होत होता.
श्री गणेश टेकडी मंदिर, श्री साईबाबा देवस्थान, शहरातील शिवमंदिरे, देवीची शक्तिपीठे, आदी साऱ्याच देवस्थानांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे, वर्षाचा पहिला दिवस आणि रविवार असल्याने बहुतांश नागरिक देवाचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटन स्थळांकडे प्रस्थान करताना दिसत होते. महाराजबाग, वस्ताद लहुजी साळवे अंबाझरी उद्यान, सेमिनरी हिल्स, आदी उद्यानांंमध्ये नागरिक कुटुंबासह नववर्षाचा आनंद लुटत असल्याचे दिसून येत होते.
गणपती बाप्पा मोरया
- विदर्भातील अष्टविनायकांपैकी पहिल्या मानाचा गणपती म्हणून श्री गणेश टेकडीला ओळखले जाते. नागपूरकरांनी सकाळपासून गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गणवती विघ्नहर्ता म्हणूनही ओळखला जातो. म्हणून भक्तांनी बाप्पाला साकडे घालत हे वर्ष निर्विघ्नपणे पार पाड, अशी प्रार्थना केली.
सब का मालिक एक
- बहुधर्मीयांचे आराध्य दैवत म्हणून श्री साईबाबांची ओळख आहे. नागपुरात साईबाबांच्या भक्तांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्या अनुषंगाने सब का मालिक एक है, असा संदेश देणाऱ्या श्रीसाईबाबांच्या चरणी वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविक नतमस्तक झाले. व्यवस्थापन मंडळाने त्या अनुषंगाने मंदिराची सजावट केली होती आणि महाप्रसादाचे आयोजनही केले होते.
उद्यानांमध्ये उडाल्या पिकनिक पार्ट्या
- शहरातील वस्ताद लहुजी साळवे अंबाझरी उद्यान, महाराज बाग उद्यान व प्राणिसंग्रहालय, सेमिनरी हिल्स येथील बालजगत, शहरातील प्रमुख ठिकाणी असणारी सक्करदरा, दत्तात्रयनगर, चिटणवीसनगर, वर्धमाननगर, आदी उद्यानांमध्ये कुटुंबवत्सल नागरिक कुटुंबासह पोहोचले होते. या उद्यानांमध्ये पिकनिक पार्टी साजरी केली जात होती.
स्वामिधाम, स्वामिनारायण देवस्थान, पोद्दारेश्वर श्री राम मंदिर
- श्री स्वामी समर्थांचे बेसा येथील स्वामिधाम, येथेच असलेले अयप्पा मंदिर, मेयो चौकातील पोद्दारेश्वर श्रीराम मंदिर, वाठोडा रिंग रोड येथील स्वामिनारायण मंदिर, सेमिनरी हिल्स येथील श्री बालाजी मंदिर, शहरातील प्राचीन शिवालये, सारीच भाविकांनी भरली होती. देवाचे दर्शन आणि त्यानंतर थोडे पर्यटन असा सारा मूड रविवारी नागरिकांचा दिसून येत होता.
प्रेमी युगुलांना मिळाली छान संधी
- थर्टी फर्स्ट आणि न्यू ईयरला जोडून वीकएंड मिळाल्याने, ही प्रेमी युगुलांसाठी छान संधी सापडली होती. सेलेब्रेशन आणि सोबत वेळ घालविण्यासाठी मिळालेल्या या संधीचे सोने करत अनेक प्रेमी युगुलांनी शहराच्या नजीक असलेल्या पर्यटन स्थळांवर, पिकनिक स्पॉटवर प्रयाण केले होते. हातात हात घालत प्रकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद हे युगुल घेत असल्याचे चित्र होते.
महाविद्यालयीन तरुणांचे सेलेब्रेशन
- वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार आल्याने आणि हा हक्काचा दिवस असल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणी सिनेमागृह, हॉटेल, रेस्टेराँमध्ये धम्माल करत होते. अनेकांनी एकत्र पार्टीचे आयोजनही केले होते. एकमेकांना ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट देऊन ते नववर्षाच्या शुभेच्छाही देत होते.