नागपूर : शहरात विविध ठिकाणी बगिचे असले तरी तेथे दिव्यांगांना जाण्यास अनेक अडचणी येतात. दिव्यांगांचे मनोरंजन व प्रशिक्षण डोळ्यासमोर ठेवून पूर्व नागपुरात राज्यातील पहिला दिव्यांग पार्क बनणार आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन त्याचे काम सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत नागपुरात आयोजित सामाजिक अधिकारिता शिबिरादरम्यान ते बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला डॉ. विरेंद्र कुमार, आमदार मोहन मते, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. प्रामुख्याने उपस्थित होते. पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानाच्या बाजूला असलेल्या जागेत हा पार्क साकारण्यात येणार आहे. या पार्कात दिव्यांगांच्या मनोरंजनासोबतच अभ्यास व प्रशिक्षणाचीदेखील सोय असेल. याशिवाय तेथे उपचाराचीदेखील व्यवस्था राहणार आहे. दोन ते तीन महिन्यांत नासुप्रला याचे काम देण्यात येईल. या पार्कचा संपूर्ण आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ३६ हजार लोकांची तपासणी झाली असून, त्यांना २ लाख ४१ हजार उपकरणे व साहित्य वितरित होणार आहेत. नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात येतील व देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा असणार दिव्यांग पार्कमधील सुविधा
- दिव्यांगांसोबत सामान्य लोकांनादेखील लाभ मिळणार.
- ऑटिस्टिक मुलांसाठीदेखील ब्लू रूमची व्यवस्था.
- हायड्रोथेरपी पॉईंटची सोय.
- पार्कमध्ये फिरण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने व व्हीलचेअर.
- दिव्यांगांच्या सुविधासाठी जागोजागी रेलिंग्ज.
- दृष्टिहिनांसाठी टच व स्मेलिंग बगिचा.
- झाडे ओळखण्यासाठी ब्रेल भाषेत पट्टी.
- ब्रेलयुक्त बुद्धिबळ, सापसिडी व इतर खेळ.
- खुले जीम व खुली सभागृह.
- टेक्सटाइल पाथ-वे.
- जगप्रसिद्ध दिव्यांगांच्या कामावर प्रकाश टाकणारे दालन.
अगोदर योजना वंचितांपर्यंत पोहोचतच नव्हत्या
अगोदरच्या सरकारमध्ये विविध योजनांची घोषणा व्हायची. मात्र त्या वंचितांपर्यंत पोहोचत नव्हत्या. दिव्यांगांमध्ये शिक्षणाचा विकास करतानाच कौशल्याचा विकासही झाला पाहिजे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी फक्त ४ श्रेणी होत्या. पण रालोआचे सरकार आल्यानंतर २१ प्रकारच्या श्रेणी करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. वीरेंद्रकुमार यांनी दिली.