लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांनाही प्राधान्य मिळावे, हक्काची जागा मिळावी, उद्योजक म्हणून त्यांनाही आपली ओळख निर्माण करता यावी यासाठी लवकरच विदर्भात महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येत आहे. राज्यातील पहिली महिला एमआयडीसीनागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शुक्रवारी नागपुरात हॉटेल सेंटर पॉइंट येथे महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. आशिष जयस्वाल उपस्थित होते. सामंत यांनी सांगितले, नागपुरातील एमआयडीसीतील जागा आता संपलेली आहे. उद्योगांसाठी नवीन जागेची गरज आहे. त्यामुळे आमडी येथे ३ हजार एकरवर नवीन एमआयडीसी उभारण्यात येणार आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्रात वीज टेरीफ जास्त आहे. विदर्भातील टेरीफचे वीज दर कमी झाले नसेल तर ते लवकरच केले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उद्योगासाठी जागा घेतली परंतु त्याचा उपयोगच केला नाही, अशा उद्योगांची जमीन शासन आपल्या ताब्यात परत घेत आहे. त्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत अशा अनेकांची जागा शासनाने परत घेतल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले.