नागपूर : शनिवारच्या मुसळधार पावसानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामाने सुरू झाले आहे. जिल्हा व महानगर प्रशासन गतीने कामी लागले असून एका दिवसात ३ हजार घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनाम्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ५५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे.
नागपूर महानगरातील ज्या घरांचे नुकसान झाले आहेत त्या घरांचे पंचनामे करणे युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक स्तरावर दहा हजार घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी तीन हजार घरांचे पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी प्रशासनाने ड्रोनद्वारे झालेल्या नुकसानीची व क्षतिग्रस्त भागांची पाहणी केली. त्यामुळे नेमके कोणते भाग प्रभावित झाले हाेते.
कोणती घरे पाण्यात बुडाली होती याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहेत. त्यानुसार प्रशासनाने बाधित वस्त्यांनुसार पंचनाम्यासाठी विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तहसीलदार संतोष खांडरे यांच्या नेतृत्वात ही टीम कार्यरत आहे.
१५०० हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पंधराशे हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाचा आहे. शुक्रवारला मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. तीन, चार तासांत ११० मिलिमीटरच्यावर पाऊस झाला. यामुळे नागपूर शहरासह ग्रामीण भागातील काही भागात नदी, नाल्यांना पूर परिस्थिती आली. नागपूर शहरात हजारो लोकांच्या घरात पाणी शिरले. काहींचा जीव गेला. पावसामुळे वित्त व जीवहानी झाली. या पावसामुळे शेतपिकांचेही नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील पंधराशे ते सोळाशे हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले.
- तहसील कार्यालयाशी संपर्क साधा
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सर्व नागरिकांनी मदतीसाठी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंचनाम्यासाठी कर्मचारी स्वत: आपल्या घरापर्यंत येणार आहेत. आपल्याकडून फार्म भरून घेणार आहेत. ज्यांच्याकडे कोणतेही कर्मचारी पंचनामासाठी आले नाहीत. आपले घर सुटले असे वाटत असेल त्यांनी सिव्हिल लाईन परिसरातील शहर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार संतोष खांडरे यांच्या कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.