नागपूर : हवामान विभागाने पुढच्या ३१ ऑगस्टपर्यंत विदर्भात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र दाेन दिवसापासून पावसाचा जाेर कमी झाला. नागपुरात मंगळवारी चक्क उन्हाची काहीली जाणवली. पाऊस थांबताच तापमान पुन्हा ३२ अंशाच्यावर गेले असून उकाडा जाणवायला लागला आहे.
बंगालच्या उपसागरासह मध्य प्रदेशात हाेणाऱ्या वातावरणीय बदलामुळे विदर्भात अतिजाेरदार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. त्यानुसार रविवार काही भागात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. पण साेमवारपासून जाेर कमी झाला. साेमवारी दिवसा रिमझिम हजेरी लागली. नागपूरच्या काही परिसरात रात्री हलक्या सरी बरसल्या व ४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. मात्र मंगळवार सकाळपासून आकाश ढगांपासून माेकळे झाले. सूर्य दर्शनासह चक्क उन्हाचे चटके जाणवायला लागले. साेमवारी ३० अंशावर गेलेला नागपूरचा पारा मंगळवारी ३२.८ अंशावर गेला. सर्व जिल्ह्यातील तापमान १ ते २ अंशाने वाढत सरासरीच्या पार गेले. चंद्रपूरला सर्वाधिक ३४.४ अंशाची नाेंद झाली. याशिवाय अकाेला ३३.१ अंश, भंडारा ३२.६ अंश, तसेच गाेंदिया, गडचिराेली, वर्धा व यवतमाळात कमाल तापमान ३२ अंशाच्यावर गेले आहे. मंगळवारी अमरावती वगळता कुठेही पावसाची नाेंद झाली नाही.यापुढे पुन्हा दाेन दिवस पावसाची उसंत राहणार असून ३० ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जाेरदार ते अतिजाेरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.