नागपूर : दशकापूर्वी नागपुरात सिमेंट रस्त्यांचा गाजावाजा करण्यात आला. उपराजधानीचा चेहरामोहरा बदलेल, शहराच्या सौंदर्यात भर पडून कोट्यवधी रुपये वाचतील. कमी खर्चात अधिक टिकावू व मजबूत रस्ते होतील. असा दावा करण्यात आला. मात्र सिमेंट रस्त्याची कामे करताना गटाराकडे दुर्लक्ष केले. काही ठिकाणी तांत्रिक बाबी विचारात घेतल्या नाहीत. परिणामी आज सिमेंट रस्ते शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. लोकमतने सिमेंट रस्त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडून नागरिकांच्या भावना मांडल्या. यासंदर्भात माजी महापौरांशी चर्चा केली असता त्यांनी यासाठी प्रशासनावर खापर फोडले. पैसे वाचविण्याच्या नादात गटार लाइनकडे दुर्लक्ष झाल्याने आज नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नागपूर शहरात वर्ष २०११ मध्ये सिमेंट रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. तीन टप्प्यात ७४१.१८ कोटी रुपये खर्च करून १२५ किलोमीटर लांबीचे सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सिमेंट रस्त्यांची कामे करताना प्रशासनाने पावसाळी नाल्या व गटरांचा विचारच केलेला नाही. दुसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाळी नाल्या टाकण्यात आल्या. पण समस्या दूर झाली नाही.
पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई होत नाही : जिचकार
शहरात सिमेंट रस्ते करण्यात आले. परंतु रस्त्यालगतच्या पावसाळी नाल्याची साफसफाई केली जात नाही. मनपात पदाधिकारी पदावर नसल्याने प्रशासनाने नाल्या सफाईकडे लक्षच दिले नाही. सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्या साफ केल्या जात नाहीत. यामुळे पावसाचे पाणी तुंबत आहे. यावर्षी जुलै महिन्यात अधिक पाऊस पडत असल्याने सिमेंट रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाल्याचे माजी महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.
पैसे वाचवण्याच्या नादात गटार व नाल्याचा विसर : जोशी
विकासकामांसाठी निधी कमी पडू नये, उत्तम दर्जाची कामे व्हावीत यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाते. मात्र प्रशासनाने पैसे वाचवत असल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेत शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे केली. तांत्रिक बाबींचा अभ्यास करून कामे करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. परंतु गटार व पावसाळी नाल्याचा विचारच केला. याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात सिमेंट रस्त्यांवर पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
रस्त्यासोबत नाल्या बनविणे आवश्यकच : तिवारी
शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे करताना रस्त्यांवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी नाल्याचा विचार करणे आवश्यक होते. ज्या ठिकाणी रस्त्याला उतार आहे, अशा ठिकाणी पावसाचे पाणी तुंबत नाही. परंतु समतल रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. यासाठी पावसाळी नाल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे तिसऱ्या टप्प्यात सिमेंट रस्त्यांना गटार व पावसाळी नाल्या आवश्यक करण्यात आल्या. मनपा व्यतिरिक्त नागपूर शहरात नासुप्र, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, मेट्रो यांच्यासह विविध संस्था काम करतात. त्यांनीही रस्त्याची कामे करताना गटार व पावसाळी नाल्या बनविणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली