नागपूर : थर्मल पॉवरमध्ये खाली होणाऱ्या मालगाडीच्या वॅगन (बॉक्स)ची साफसफाई कंत्राटदार करून देईल आणि तोच कंत्राटदार रेल्वे प्रशासनाला वर्षाला तब्बल ७६ लाख रुपयेसुद्धा देईल. अविश्वसनीय वाटत असले तरी हे खरे आहे. नुकताच तसा करार संबंधित कंत्राटदाराने रेल्वे प्रशासनासोबत केला आहे.
थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळसा पुरविण्याची जबाबदारी रेल्वेकडे असते. वर्षभर ही प्रक्रिया सुरू होते. प्लांटमध्ये कोळसा रिकामा केल्यानंतर खाली वॅगन रॅक घेऊन मालगाडी अजनीच्या गुडस् यार्डमध्ये साफसफाईसाठी नेली जाते. कारण यांत्रिक विभागाच्या वॅगन तपासणीसाठी ती पूर्ण रिकामी असणे आवश्यक असते. दरम्यान, प्लांटमध्ये डबे रिकामे झाले तरी प्रत्येक डब्यात थोडा थोडका कोळसा पडून असतोच. या डब्यांची (रॅक) सफाई अजनीच्या यार्डमध्ये केली जाते.
त्यावेळी कंत्राटदार हा कोळसा जमा करतो आणि तो परस्पर विकला जातो. वर्षभरात सुमारे सात हजारांपेक्षा जास्त डब्यांची सफाई केली जात असल्याने लाखो रुपयांचा कोळसा कंत्राटदारांच्या हाती लागतो. ही बाब मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी हेरली. रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेतर्फे रिकाम्या वॅगनची साफसफाई आणि त्यातून निघणाऱ्या कोळसा संकलनासंबंधीचा ऑनलाईन ई लिलाव ठेवला. त्यानुसार, एका कंत्राटदाराने संबंधित रॅकची सफाई करून त्यातून निघालेल्या कोळशासाठी रेल्वेला दरवर्षी ७५ लाख, ७८ हजार रुपये देण्याची तयारी आपल्या निवेदनातून दाखविली. ती मंजूर करून संबंधित कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले. त्यानुसार, आता हा कंत्राटदार दोन वर्षांत रेल्वे मालगाडीच्या सुमारे १४, ४३४ वॅगनची साफसफाई करेल आणि त्यातून गोळा केलेल्या कोळशापेक्षा सुमारे दीड कोटी रुपये रेल्वे प्रशासनाला देईल.
नॉन फेअर रेव्हेन्यू
रेल्वेला मुख्य उत्पन्न प्रवाशांच्या तिकिटातून आणि खान-पान सेवेतून मिळते. त्या व्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नाला नॉन फेअर रेव्हेन्यू म्हटले जाते. उत्पन्नाचा हा नवीन स्त्रोत पहिल्यांदाच शोधण्यात आल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. रेल्वेच्या अन्य विभागात त्याचे अनुकरण केले जाणार असून त्यामुळे ते रेल्वे मालगाडीसाठी उत्पन्नाचे डबल इंजिन ठरू शकते.