योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोन्याची माती विकण्याच्या बहाण्याने तीन आरोपींनी एका कुटुंबाला साडेपंधरा लाखांचा गंडा घातला. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.मनोज बिहारीलाल गुप्ता (५२, रामदासपेठ) हे त्यांची आई, पत्नी व मुलांसोबत राहतात व त्यांच्या वडिलांचे २२ वर्षांअगोदर निधन झाले होते. काही महिन्यांच्या अगोदर त्यांना अजित चौधरी नावाच्या व्यक्तीचा फोन आल व २५ वर्षांअगोदर मी तुमच्या वडिलांना ओळखायचो. तुमची आई माझ्या बहिणीसारखी असून मी नागपुरात आल्यावर भेट घेतो असे समोरील व्यक्तीने सांगितले. १८ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित व्यक्ती नागपुरात आला व हरियाणातील गावाबाबत त्याने गोष्टी सांगितल्या. त्यानंतर तो चार ते पाच वेळा गुप्ता यांच्याकडे आला. एकदा तो एका ६५ वर्षाच्या व्यक्तीला घेऊन आला व गावाकडे एका विधवा महिलेकडे सोन्याची माती असल्याचा दावा केला. तिच्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असून ती स्वस्तात माती देऊ शकते अशी बतावणी केली. ४ फेब्रुवारी तो त्या महिलेला घेऊन आला व माती दिली. गुप्ता यांनी सोनाराकडे माती तपासली असता त्यात दोन ग्रॅम सोने निघाले. ६० लाखांचे सोने २० लाखांत देण्याची त्यांनी तयारी दाखविली. २० फेब्रुवारी आरोपीने ती महिला व तिचा भाऊ नागपुरात आल्याचे सांगितले. महिलेची प्रकृती ठीक नसून तिच्या भावाला घेऊन येतो असे म्हणून आरोपीने एका व्यक्तीला आणले. मातीतून गॅसच्या माध्यमातून २० ग्रॅम सोने काढून दाखविले. गुप्ता यांनी ईतवारीतील सोनाराकडून तपासले असता ते सोने २३ कॅरेटचे निघाले. त्यांचा आरोपींवर विश्वास बसला व साडेपंधरा लाख रुपये त्यांना दिले. विधवा महिलेकडून सोन्याची माती आणून देतो असे सांगून आरोपी निघून गेले. त्यानंतर त्यांचे फोन स्वीच ऑफ झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अखेर गुप्ता यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चक्क सोन्याची माती विकण्याचा फंडा, व्यापाऱ्याला घातला साडेपंधरा लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: May 08, 2024 10:07 PM