मुकेश कुकडे
नागपूर : नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडीच्या गणरायाला वाहिलेली फुलं, हार काही वेळानंतर त्याचे निर्माल्यात रूपांतर होते. या निर्माल्यापासून टेकडी गणपती मंदिरात धूपकांडी तयार केली जात आहे. या उपक्रमामुळे रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न मार्गी लागला असून, भक्तांच्या श्रद्धेचादेखील मान राखला जात आहे.
रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे २५ किलो धूपकांडी रोज तयार केल्या जा. महत्त्वाचे म्हणजे आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध धूप स्वरुपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार, हे समजल्यावर भक्तदेखील मोठ्या उत्सुकतेने धूपकांड्या विकत घेत आहेत. या उपक्रमामुळे पाच महिलांना तर रोजगार मिळाला आहे, शिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे.
टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे. सीताबर्डीच्या टेकडीवर हे गणपती मंदिर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षभर भक्तांची गर्दी असते. बाप्पाला श्रद्धेपोटी हार, फुलं मोठ्या प्रमाणात अर्पण केली जातात. टेकडी गणेश विश्वस्त मंडळाकडून या निर्माल्यावर प्रक्रिया केली जात आहे. मंदिरात निघालेले निर्माल्य काही दिवस वाळविले जाते. त्यानंतर मशीनमध्ये क्रश करून त्याची पावडर तयार केली जाते. त्यात प्रीमिक्स (गाईचे शेण, सुगंधी द्रव्य) टाकून ते परत मशीनमध्ये मिक्स केल्या जाते. त्यानंतर मशीनद्वारे धूपकांडी तयार केली जाते. टेकडी गणेश मंदिरात एका दिवसात सुमारे २० ते २५ किलो धूप तयार केले जाते. हे धूप केवळ १० रुपयांमध्ये मंदिरात येणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून दिले जाते.
भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने देवाला हार फुलं अर्पण केली जातात. त्याचे निर्माल्यात रूपांतर झाल्यानंतर ते कचऱ्यात टाकल्यास भक्तांच्या मनात मंदिराचे पावित्र्य कमी होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून धूपकांड्या तयार करण्याचा निर्णय विश्वस्तमंडळाने घेतला आहे. त्या माध्यमातून पाच महिलांना रोजगार मिळतो आहे आणि भक्तांच्या भक्तीचा मानदेखील ठेवल्या जातोय.
- श्रीराम कुळकर्णी, सचिव, टेकडी गणेश विश्वस्त मंडळ