‘हम दो आणि बाकी कुणी नाही’ असाच राज्याचा कारभार, अजित पवारांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 10:21 AM2022-07-28T10:21:12+5:302022-07-28T10:47:26+5:30
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात जवळपास १० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुमारे पंधरा दिवस झाले तरी विदर्भातील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे केवळ दावे करायचे व प्रत्यक्षात हम दो आणि बाकी कुणी नाही, असा राज्याचा कारभार चालवायचा, अशी स्थिती असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विदर्भाच्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बुधवारी रात्री नागपुरात आगमन झाले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत मिळायला हवी होती; परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले तरी अपेक्षित मदत मिळाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही अडलेलाच आहे. अस्मानी संकटाच्या स्थितीत इतके मोठे राज्य दोन मंत्र्यांच्या भरवशावर चालविणे शक्य नाही. दिवसभर सह्या करणे शक्य नाही व त्यामुळे अनेक मुद्दे प्रलंबित पडत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.
पालकमंत्रीच नाही, मदत कशी मिळणार?
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नाही. एकाही जिल्ह्यात पालकमंत्री नाही. त्यामुळे जिल्हापातळीवर निर्णय होत नाही. त्यामुळे मदत मिळणार तरी कशी, असा सवाल पवार यांनी केला. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी तरी पावसाळी अधिवेशन लगेच घ्यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
ठाकरेंच्या मुलाखतींवर प्रत्युत्तर देऊन प्रश्न सुटणार नाहीत
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रत्युत्तर देण्यात सत्ताधाऱ्यांना जास्त रस दिसतो आहे. मात्र, त्यांना प्रत्युत्तर देऊन राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ‘एसडीआरएफ’चे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दोन ते अडीच पट मदत केली होती. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, असे पवार यांनी प्रतिपादन केले.
गडचिरोलीच्या दुर्गम भागाला भेट
अजित पवार यांनी आज (२८ जुलै) गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी देखील केली.