कमलेश वानखेडे, नागपूर: राज्य सरकारने मराठा समाजाला अतिरिक्त १० टक्के आरक्षण दिले. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. सरकारने ओबीसी समाजाला २९ सप्टेंबरला दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे मी ओबीसी समाजातर्फे सरकारने अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.
तायवाडे म्हणाले, मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी संघटनांच्या शिष्टमंडळाशी मुंबईत झालेल्या बैठकीत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संविधान चौकात ओबीसी आंदोलनाच्या मंचावर येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देण्याचा शब्द दिला होता. दोन्ही नेत्यांनी तो शब्द पाळला आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसींचे कुठलेही नुकसान झाले नाही.सरकार कोणतेही असो, कोणत्याही पक्षाचे असो, संविधानाच्या कक्षेत व न्यायालयात कक्षेत बसेल तेच आरक्षण दिले जाईल. राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला आहे.