नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच काम केले आहे. त्यांच्या भाषणात नेहमीच छत्रपतींचा उल्लेख असतो. त्यांनी कधीही इतिहास किंवा छत्रपतींच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्यांनी त्यादिवशी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ते नागपुरात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार, नितीन गडकरी मंचावर असताना या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र इतिहासावर कुणी जाऊ नये, विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे. टीकाटिप्पणी करण्यासाठी अशा मुद्द्यांवर बोलू नये, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी यांनी राहुल गांधी यांची घेतलेल्या गळाभेटीवरही त्यांनी टीका केली. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर तयार झालेली शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या शिवसेनेला मूठमाती देण्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. आपला पक्ष वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या समाजवादी पार्टी, अबू आझमी किंवा असदुद्दीन ओवैसींसोबतही युती करू शकतात.
सध्या राज्यात आमचे व मित्रपक्षांचे १६४ उमेदवार आहेत व लवकरच ते १८४ जागांवर पोहोचतील. २०२४च्या निवडणुकांत महाविकास आघाडीला उभे करण्यासाठी सक्षम उमेदवार सापडणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना आता यावर अधिक काही बोलू नये, असेदेखील ते म्हणाले.