नागपूर : २०२२ मध्ये शहरात हत्यांसह हिंसक गुन्ह्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली असली तरी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरात महिला अत्याचाराच्या दोनशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अपहरणाच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. आगामी विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसंदर्भातील ही आकडेवारी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
२०२१ साली महिला अत्याचाराचे २३४ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यात ऑक्टोबरपर्यंत १९८ गुन्हे दाखल झाले होते. यंदा पहिल्या दहा महिन्यांतच २०० घटना समोर आल्या आहेत. महिला अत्याचाराचे गुन्हे नियंत्रणात येतील, असे दावे पोलीस विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, आकडे कमी होण्याऐवजी दोनने वाढल्याचे दिसून आले आहे.
महिला अत्याचार नियंत्रणासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बहुतांश गुन्हेगार ओळखीचेच
महिला अत्याचाराचे बहुतांश गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच झाले आहेत. हे प्रमाण ९३ टक्क्यांहून अधिक आहे. याशिवाय सर्वच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
विनयभंगाचे प्रमाण १८ टक्क्यांनी घटले
महिलांच्या विनयभंगाचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. २०२१ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत विनयभंगाच्या ३०० घटनांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा २४५ इतका आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १८ टक्क्यांनी घटले.
खुनांच्या घटनांमध्ये ३५ टक्क्यांनी घट
महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्या तरी खून व प्राणघातक हल्ल्यांच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मागील वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरात ८२ खून झाले होते. यावर्षी ही संख्या ५३ इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पहिल्या दहा महिन्यांत खुनाच्या घटनांमध्ये ३५ टक्क्यांनी घट झाली. दुसरीकडे प्राणघातक हल्लेदेखील घटले आहेत. २०२१ मध्ये दहा महिन्यांत १०१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०२२ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या काळात खुनाच्या प्रयत्नांचे ७२ गुन्हे नोंदविल्या गेले आहेत.