नागपूर : नागपुरात पाहिजे त्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस वाढलेली नाही. आपला सामना बलाढ्य भाजपशी आहे. त्यामुळे आता पक्षात गटतट चालणार नाही. संघटनेचे काम शिस्तीनेच व्हायला हवे. एकोप्याने काम करा; अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नववर्ष स्नेहमिलन सोहळा गुरुदेव सेवाश्रम, गांधीसागर येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजी आमदार दीनानाथ पडोळे, आभा पांडे आदी उपस्थित होते. यावेळी पटेल यांनी पदाधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. ते म्हणाले की, आता अनिल देशमुख बाहेर आले आहेत. आता सर्व जण जोमाने कामाला लागा. शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर आहे. निवडणुका लांबणीवर गेल्याचा फायदा घ्या. आपसात भांडण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचा. एकवेळ विमानतळावर स्वागतासाठी नाही आले तरी चालेल; पण पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहा व पक्षाने दिलेला कार्यक्रम राबवा.
शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले की, नवीन वर्षात प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्षाला संघटनबांधणीसाठी मदत करावी. जे निवडणूक लढू इच्छित आहेत, नवीन आहेत, त्यांची प्रत्येक प्रदेश पदाधिकाऱ्याने जबाबदारी स्वीकारावी. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी मोठ्या नेत्यांनी नागपुरात लक्ष द्यावे. पक्षासह कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अनिल अहीरकर, दिनेश बंग, सुनीता येळणे, लक्ष्मी सावरकर, अर्चना हरडे, अविनाश काकडे, प्रशांत पवार, अविनाश गोतमारे, उज्ज्वला बोढारे, सतीश इटकेलवार, विशाल खांडेकर, महेंद्र भांगे आदी उपस्थित होते.