योगेश पांडे
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाइन’च्या युगात शिक्षकदेखील अनेकदा विद्यार्थ्यांशी विविध ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून संपर्कात राहतात. मात्र शहरातील नामांकित विधि महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेसाठी ‘इन्स्टाग्राम’वरील खात्याने डोकेदुखी वाढविली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने ‘फेक प्रोफाइल’ तयार करून विद्यार्थी व परिचितांना दिशाभूल करणारे मेसेजेस पाठविण्यास सुरुवात केली आहे. संबंधित प्राध्यापिकेला अखेर पोलिसांकडे धाव घ्यावी लागली; परंतु पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर आरोपीने त्यांच्या नावाने आणखी एक ‘फेक प्रोफाइल’ तयार केल्याने प्रकरणातील गंभीरता वाढली आहे.
विधि महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापिकेचे ‘इन्स्टाग्राम’वर खाते होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या युझरनेमशी मिळतेजुळते नाव घेत ‘फेक प्रोफाइल’ तयार केले. संबंधित व्यक्तीने त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी ‘कनेक्शन’ वाढविले. हा प्रकार सुरू असताना याची कुठलीही माहिती प्राध्यापिकेला नव्हती. जानेवारी महिन्यात एका विद्यार्थिनीने त्यांच्या कानांवर हा प्रकार टाकला. त्यानंतर प्राध्यापिकेने याची चाचपणी केली असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या विद्यार्थ्यांना व परिचितांना ‘फेक प्रोफाईल’वरून दिशाभूल करणारे संदेश पाठविले होते. कुणी विद्यार्थी किंवा परिचिताचा खोडसाळपणा आहे का, हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीच समोर न आल्याने अखेर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ‘सायबर सेल’कडे धाव घेतली व तक्रार केली. बेलतरोडी पोलिस ठाण्याकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली. मात्र त्यानंतरदेखील प्राध्यापिकेचा त्रास संपला नाही. अज्ञात आरोपीने मागील आठवड्यातच त्यांच्या नावाने परत एक ‘फेक प्रोफाईल’ तयार करून विद्यार्थ्यांना ‘मेसेज’ पाठविण्यास सुरुवात केली. ही बाब कळताच प्राध्यापिकेने परत बेलतरोडी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्यांनी आणखी एक तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकारामुळे विधि महाविद्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थी की परिचिताचा प्रताप ?
संबंधित प्राध्यापिका अनेक वर्षांपासून विधि महाविद्यालयात शिकवत आहे. नवीन पिढीसोबत ‘कनेक्ट’ राहता यावे यासाठी त्यांनी ‘इन्स्टाग्राम’वर खाते सुरू केले. सलग दोन ‘फेक प्रोफाइल’ तयार करणे हा प्रकार एखाद्या आजी-माजी विद्यार्थ्याने केला आहे की कुणा परिचिताने केलेला हा प्रताप आहे, या दिशेनेदेखील पोलिस तपास करीत आहेत.