नागपूर : रस्त्यावरून जाताना पिकअप व्हॅनचा दरवाजा एका महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यासाठी मृत्यूचे कारण बनला. पिकअप व्हॅनचालकाने अचानक दरवाजा उघडला व त्याच्या निष्काळजीपणामुळे मागून दुचाकीवरून येणारी महिला दरवाजाला धडकली. त्यानंतर खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून एसटी बसचे चाक गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातामुळे घटनास्थळावरील लोक अक्षरश: हादरले होते.
शीतल विकास यादव (४२, द्वारका अपार्टमेंट, खामला) असे मृत महिलेेचे नाव आहे. बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास त्या काँग्रेसनगरकडून धंतोली पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरून चालल्या होत्या. कार्यालय अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच-३१-डी-०६९८ या क्रमांकाच्या पिकअप व्हॅनचा चालक अमित निभोरकर (३०) हा खाली उतरायला गेला व त्याने मागे न पाहता निष्काळजीपणे दरवाजा उघडला. मागून येणाऱ्या शीतल त्या दरवाजाला धडकल्या व रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी एसटी महामंडळाची बस मागून येत होती. त्या पडल्यावर लगेच त्या बसखाली आल्या व त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने सर्वच जण हादरले. तातडीने याची सूचना धंतोली पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
वारंवार दिसतो निष्काळजीपणा
कार किंवा पिकअप व्हॅनचा दरवाजा उघडताना आरशात मागून कुठले वाहन येत आहे का, याची चाचपणी करणे अनिवार्य असते. मात्र अनेक जण निष्काळजीपणा दाखवतात. शहरातील अनेक रस्त्यांवर यामुळे अपघात होताना दिसून येतात. मात्र तरीदेखील लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. अशाच निष्काळजीपणामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्याचा नाहक जीव गेला.