नागपूर : 'स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे, अशी भावना मृत्यूरुपी पात्राने 'वीर सावरकरांचा मृत्यूची संवाद' या अभीवाचन कार्यक्रमात व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे मृत्यूशय्येवर असताना अंतिम २६ दिवसांचे त्यांचे आणि मृत्यूरुपी काळ यांच्यातील संवादरुपी जीवनपटाचे अभिवाचन दिग्दर्शक नरेंद्र आमले आणि मुंबई आकाशवाणी येथील वृत्त निवेदक उमेश घळसासी यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती दिनाच्या पर्वावर अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे हा अभिवाचन कार्यक्रम पार पडला. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पोकळे पाटील, पिंपरी चिंचवड येथील रंगमुद्रा थिएटरचे नरेंद्र आमले, उमेश घळसासी, विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, विद्यापीठ शताब्दी महोत्सव सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रमोद तिजारे आदी व्यासपीठावर होते.
वि. दा. सावरकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेपासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट अभिवाचनातून उलगडला गेला. 'स्वातंत्र्य लक्ष्मी की जय' असा दिलेला नारा, विदेशी कापडांची होळी केल्याने फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी ठोठावलेला १० रुपयांचा दंड, लंडनच्या इंडिया हाऊस मधील मदनलाल धिंग्रा आणि क्रांतिकारकांसोबत आलेला सहवास, २१ पिस्तूल भारतात पाठविण्याची कामगिरी, 'ने मजसी ने परत मातृभूमीला' कवितेच्या आठवणीची उजळणी, स्वातंत्र्यवीरांसह संपूर्ण सावरकर कुटुंबीय झाले निर्वासित, दोन जन्मठेपेची म्हणजेच ५० वर्षाची काळ्या पाण्याची अभूतपूर्व शिक्षा, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये खचून न जाता लाभलेले मानसिक स्थैर्य, एकांत वास मिळाल्याने विज्ञानाधिष्ठ हिंदुत्वनिष्ठ होण्याचे कारण असे त्यांच्या मृत्यूपर्यंतचा जीवनपट या अभिवाचनातून व्यक्त करण्यात आला.