नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद खेचण्यात काँग्रेसला यश आले असून, या पदावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नेम साधणारे वडेट्टीवार यांना हायकमांडकडून एकप्रकारे पाठबळ देण्यात आले आहे. पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे.काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात या तीन दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती, तर दुसऱ्या फळीतील सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा होती; पण शेवटी विदर्भातीलच पटोले विरोधक असलेले वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली. या नियुक्तीमागे पटोले यांना ‘चेक’ देण्याची हायकमांडची खेळी असल्याची चर्चा आहे. पटोले व वडेट्टीवार यांच्यात काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा सुरू आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला साथ दिल्याच्या कारणावरून पटोले यांनी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदमुक्त केले होते. देवतळे हे वडेट्टीवारांचे समर्थक आहेत. या कारवाईमुळे दुखावलेल्या वडेट्टीवारांनी समर्थकांसह दिल्ली गाठत पटोलेंकडून राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आल्याची बाजू मांडली होती.
आधी विखे, आता पवारांमुळे संधी राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारच शिंदे सरकारसोबत थेट सत्तेत बसले. तेव्हापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. या पदावर व़डेट्टीवार यांना संधी मिळाली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राधाकृष्ण विखे-पाटील भाजपसोबत गेल्यामुळे २४ जून २०१९ रोजी वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली होती.