नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली. आता तीनही पक्षाच्या हायकमांडने एकत्रित बंडखोरांचा शोध घ्यावा. दोषी आमदारांवर संबंधित पक्षांनी कारवाई करावी, सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली. ठाकरे म्हणाले, काँग्रेसचे मतं बरोबर मिळाली आहेत. जी मतं फुटली अशी शंका आहे ते यावेळी दिसून येतील.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सत्यजित पाटील यांनी निवडणुकीसाठी व्युवरचना तयार केली होती. कुणी कुणाला कसे मतदान द्यायचे, हे समजून दिले होते. मतमोतजणी प्रतिनिधीला याची माहिती दिली होती. प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर, शेकापचे जंयत पाटील यांना कुणी मते द्यायची हे देखील निश्चित करून देण्यात आले होते. त्यामुळे कुणाचे मत फुटले हे ओळखणे फारसे कठीण नाही. राष्ट्रवादीचीही मते फुटली असू शकतात. एकट्या काँग्रेसवरच ठपका ठेवणे योग्य नाही. त्यामुळे तीनही हायकमांडने शोध घ्यावा व बंडखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी केली.
गेल्या वेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतही मते फुटली होती व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्याचवेळी हायकमांडने फुटीर आमदारांचा शोध घेऊन कारवाई केली असती तर आज पुन्हा बंडखोरी करण्याची हिंमत केली नसती, असेही ठाकरे म्हणाले.