गौतम अदानी यांच्याविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 07:52 PM2023-02-06T19:52:55+5:302023-02-06T20:02:04+5:30

Nagpur News जगप्रसिद्ध भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्याविरुद्धची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पहिल्याच सुनावणीनंतर फेटाळून लावली.

The High Court rejected the petition against Gautam Adani | गौतम अदानी यांच्याविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली

गौतम अदानी यांच्याविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Next
ठळक मुद्देपासपोर्ट जप्त करण्याची केली होती विनंती

नागपूर : जगप्रसिद्ध भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्याविरुद्धची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पहिल्याच सुनावणीनंतर फेटाळून लावली. संबंधित याचिका दखल घेण्यासारखी नाही, असे न्यायालयाने हा निर्णय देताना सांगितले. अदानी समूहावर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेता गौतम अदानी यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली होती.

नवीन मानकापूर (नागपूर) येथील पत्रकार सुदर्शन बागडे यांनी ही याचिका दाखल केली होती. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने गैरव्यवहाराचा आरोप केल्यामुळे अदानी समूहाचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अवघ्या चार-पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्येही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ते जगातील २० सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले आहेत. या परिस्थितीत ते विदेशात पळून गेल्यास भारतातील वित्तीय संस्था, गुंतवणूकदार आदींचे नुकसान भरून निघणार नाही. यापूर्वी अनेक भारतीय व्यावसायिक कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेले आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. संतोष चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The High Court rejected the petition against Gautam Adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.