राकेश घानोडेनागपूर : तपोवन भिक्षू संघाला वरोरा-चिमूर मार्गावरील रामदेगी वन परिसरातून हटविण्यासाठी वन विभागाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेता फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
रामदेगी प्राचीन तीर्थस्थळ आहे. तपोवन भिक्षू संघाचा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निवास आहे. वन विभागाने हा परिसर रिकामा करण्याची कारवाई सुरू केल्यामुळे संघाने वरोरा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून जागेचा ताबा कायम ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वन विभागाने हा दावा फेटाळून लावण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दिवाणी न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केल्यामुळे वन विभागाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दिवाणी न्यायालयाला संघाच्या दाव्यावर सुनावणी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तो दावा अवैध ठरविण्याची विनंती वन विभागाने केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात संघाने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी कायदा आणि नियमानुसार संबंधित दावा कायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच, त्या दाव्यावर अंतिम निर्णय होतपर्यंत संघाला रामदेगीमधून हटविले जाऊ शकत नाही, असा मुद्दा मांडला. संघातर्फे ॲड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.