तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 3, 2023 01:01 PM2023-03-03T13:01:48+5:302023-03-03T13:20:31+5:30
एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर
नागपूर : नातेवाईक महिलेला एका गुन्ह्यातून वाचविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणणारा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कार्यरत डॉक्टर जिजस ऊर्फ प्रांजल रमेश वाघळे (३६) याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. न्यायालयाने त्याची एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर केली व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला.
न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वाल्मीकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला. ९ मार्च २०२२ रोजी बेलतरोडी पोलिसांनी वाघळेविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, १७०, १७७, १८२, १८९ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. वाघळेची नातेवाईक कामिनी ऊर्फ प्रिया संजय वैरागडे ही शस्त्राने जखमी करण्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तिला या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वाघळे १९ जानेवारी २०२२ रोजी अजनी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त व बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना वेगवेगळ्या वेळी भेटला.
दरम्यान, त्याने तो पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा कायद्यानुसार तपास केला जाईल, अशी भूमिका घेतल्यानंतर वाघळेने त्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता वाघळे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत नसल्याची माहिती मिळाली, अशी तक्रार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.