१२५ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचा हायकोर्ट घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 08:28 PM2022-08-10T20:28:37+5:302022-08-10T20:29:11+5:30

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाच्या वतीने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा आढावा घेतला जाणार आहे.

The High Court will review the inquiry into the 125 crore scam | १२५ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचा हायकोर्ट घेणार आढावा

१२५ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचा हायकोर्ट घेणार आढावा

Next
ठळक मुद्देजिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल करताहेत चौकशी

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाच्या वतीने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याकरिता न्यायालयाने बुधवारी संबंधित जनहित याचिकेवर येत्या २४ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

यासंदर्भात शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बँकेचे या घोटाळ्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशी केली जात आहे. त्याकरिता राज्य सरकारने कडक शिस्तीकरिता ओळखले जाणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांची नियुक्ती केली आहे, तसेच त्यांना सहकार्य करण्यासाठी अनुभवी वकील ॲड. ज्योती वजानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चौकशीद्वारे दोषी संचालकांची आर्थिक जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

या चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आलेले निवृत्त न्या. जे. एन. पटेल हे चौथे व्यक्ती होत. यापूर्वी सहकार विभागाचे लेखाधिकारी यशवंत बागडे, ॲड. सुरेंद्र खरबडे आणि निवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. बागडे यांनी २०१३ मध्ये चौकशी पूर्ण केली होती. परंतु, तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्यांचा अहवाल नामंजूर करून नव्याने चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे खरबडे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दरम्यान, खरबडे यांनी वैयक्तिक कारणांमुळे स्वत:च चौकशी सोडली. परिणामी, २०१७ मध्ये मोहोड यांची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. ते देखील आरोग्यविषयक समस्यांमुळे ही चौकशी तातडीने पूर्ण करू शकले नाही. याकरिता, आता निवृत्त न्या. पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. मेहरोज खान पठाण यांनी कामकाज पाहिले.

माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी

२० वर्षे जुन्या या घोटाळ्यात एकूण ११ आरोपी आहेत. राज्याचे माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. घोटाळा झाला त्यावेळी ते बँकेचे अध्यक्ष होते. इतर आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश दामोदर पेशकर, रोखे दलाल केतन कांतिलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी, अमित सीतापती वर्मा, महेंद्र राधेश्याम अग्रवाल, श्रीप्रकाश शांतिलाल पोद्दार, संजय हरिराम अग्रवाल व कानन वसंत मेवावाला यांचा समावेश आहे.

Web Title: The High Court will review the inquiry into the 125 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.