नागपूर : भारतातील एक आलिशान आणि हायस्पीड ट्रेन म्हणून गणल्या जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला सर्वाधिक प्रवाशांचा प्रतिसाद नागपूर - बिलासपूर - नागपूर मार्गावर मिळत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या संबंधाने दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे.
मध्य रेल्वेने आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील विविध मार्गांवर धावणाऱ्या १५ वंदे भारत एक्स्प्रेसच्या जून महिन्यातील प्रवाशांच्या संख्येची सरासरी टक्केवारी प्रसिद्धीला दिली आहे. त्यानुसार, जून महिन्यात ट्रेन नंबर २०८२६ नागपूर बिलासपूर एक्स्प्रेसमध्ये १२०.३६ टक्के प्रवाशांनी प्रवास केला, तर ट्रेन नंबर २०८२५ बिलासपूर - नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्यांची सरासरी टक्केवारी १२७.३९ एवढी आहे.
ट्रेन नंबर २२२२६ सोलापूर - सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसने १०७.१६ टक्के तर सीएसएमटी मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने ९५.५५ टक्के प्रवाशांनी प्रवास केला.
ट्रेन नंबर २२२२४ साईनगर शिर्डी सीएसएमटी मुंबई वंदे भारतच्या प्रवाशांची सरासरी टक्केवारी ८४.०४ टक्के तर ट्रेन नंबर २२२२३ सीएसएमटी मुंबई - शिर्डी वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांची सरासटी टक्केवारी ८५.०३ एवढी आहे. नुकतीच सुरू झालेल्या ट्रेन नंबर २२२२९ सीएसएमटी - गोवा एक्स्प्रेसची प्रवाशांची सरासरी ९३ टक्के आहे.
गेल्या दोन दिवसांतील प्रतिसाद
गेल्या दोन दिवसांत ट्रेन नंबर २०८२६ नागपूर बिलासपूर एक्स्प्रेसमध्ये १०७.७३ टक्के प्रवाशांनी प्रवास केला, तर ट्रेन नंबर २०८२५ बिलासपूर - नागपूर मार्गावर प्रवाशांच्या सरासरी टक्केवारीचा आकडा १२१.५० एवढा आहे. ट्रेन नंबर २२२२६ सोलापूर - सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसने ११२.४१ टक्के तर सीएसएमटी मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणारांची टक्केवारी १११.४३ आहे.
साईनगर शिर्डी सीएसएमटी मुंबई वंदे भारतच्या प्रवाशांची १००.६२ टक्के तर सीएसएमटी मुंबई - शिर्डी वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांची सरासरी टक्केवारी ९८.६७ एवढी आहे.
सीएसएमटी - गोवा एक्स्प्रेसची प्रवाशांची सरासरी टक्केवारी १०२.२६ ९३ टक्के तर, गोवा सीएसएमटी मुंबई प्रवाशांची टक्कवारी ९२.०७ एवढी आहे.