सुमेध वाघमारे
नागपूर : आज बाजारात गर्भनिरोधकाची अनेक साधने सहज उपलब्ध आहेत. मात्र, राज्यात याचा सर्वाधिक वापर नागपूर जिल्ह्यात होत असल्याचे ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’तून पुढे आले आहे. याचे प्रमाण ८४ टक्के आहे. विशेष म्हणजे, राज्यात कुटुंब नियोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापरात ३ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
जोडप्यांच्या गरजांनुसार अनेक प्रकारचे गर्भनिरोधक आज उपलब्ध आहेत. यात कंडोम, गर्भनिरोधक खायच्या गोळ्या (ओरल पिल्स), कॉपर टी, मल्टिलोड, आदी साधने आहेत. ही नियमितपणे आणि सातत्याने वापरायची असतात. गर्भधारणा हवी असल्यास या साधनांचा वापर बंद करता येतो. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’च्या अहवालानुसार महाराष्ट्रात गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचे प्रमाण ६६ टक्के आहे. यात राज्यात पहिल्या पाचमध्ये विदर्भातील जिल्हे आहेत. यात नागपूर अग्रस्थानी म्हणजे ८४ टक्के आहे. याशिवाय, बुलडाणा ८१ टक्के, चंद्रपूर ८० टक्के, तर वर्धा व अमरावती ७९ टक्के आहेत.
कुटुंब नियोजनात विदर्भात ६ टक्क्यांनी वाढ
‘सर्व्हे’नुसार विदर्भात कुटुंब नियोजनाचे प्रमाण २०१५-१६ मध्ये ७२ टक्क्यांवर होते. २०२०-२१ मध्ये त्यात ६ टक्क्यांनी वाढ होऊन ७८ टक्क्यांवर आले आहे. मागील वर्षी नागपूर जिल्ह्यात हे प्रमाण ८४ टक्के, भंडाऱ्यात ७७ टक्के, वर्ध्यात ७९ टक्के, गोंदियात ७८ टक्के, चंद्रपूरमध्ये ८० टक्के, गडचिरोलीमध्ये ७६ टक्के, अकोल्यात ७७ टक्के, अमरावतीमध्ये ७९ टक्के, यवतमाळमध्ये ७८ टक्के, बुलढाण्यात ८१ टक्के, तर वाशिममध्ये ७१ टक्के आहे. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत हे प्रमाण वाढले आहे.
२०१६ मध्ये कंडोमचा वापर होता ७ टक्के
राज्यात २०१६ मध्ये कंडोमचा वापर ७.१ टक्के होता. २०२१ मध्ये तो वाढून १०.२ टक्क्यांवर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रामीणमध्ये कंडोम वापरण्याचे प्रमाण ७.१ टक्के, तर शहरात त्याच्या दुप्पट म्हणजे १४.१ टक्के आहे. गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण २०१६ मध्ये २.४ टक्के, तर २०२१ मध्ये हे प्रमाण कमी होऊन १.८ टक्क्यांवर आले आहे.