विजय नागपुरे
कळमेश्वर (नागपूर) : श्रीक्षेत्र आदासा हे शमीविघ्नेश्वर देवस्थानसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. या देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. परंतु याच क्षेत्रात पुरातन असलेल्या बाहुली विहिरींचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. श्रीक्षेत्र आदासा येथे कोरीव दगडापासून साकारण्यात आलेल्या बाहुली विहिरी म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमूना आहे.
आदासा येथे ग्रामपंचायतजवळ असलेली बाहुली ही पटकाखेडी येथील व्यक्तीने परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता बांधलेली होती. तर गोडशेच्या वाड्याजवळ असलेली बाहुली विहिरीचा उपयोग ठरवीक मंडळीच करायचे असे ग्रामस्थ सांगतात. तसेच मातोश्री वृद्धाश्रमजवळील विहीर ही देवस्थान अंतर्गत येत असून या विहिरीतील पाण्याचा वापर शमी विघ्नेश्वराचे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी करण्यात आला होता, अशी माहिती आहे.
ग्रामपंचायतजवळील बाहुली विहीर ही अंदाजे ६५ फूट खोल आहे. विहिरीचे दुमजली बांधकाम असून वरच्या भागावर बांधण्यात आलेल्या खोलीत आराम करण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. या विहिरीचे बांधकाम मजबूत असून विहिरीची साफसफाई व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परंतु सध्या संपूर्ण विहीर कोरडी असून नागरिक येथे केरकचरा टाकत असल्याने ते बुजण्याच्या मार्गावर आहे. तसेच गोडशेच्या वाड्याजवळील विहीर पूर्णत: जीर्ण झाली असून तिचे बांधकाम अष्टकोनी आकारात आहे.
२४ वर्षांपूर्वी मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका देणगीदाराच्या आर्थिक साह्यातून वृद्धाश्रम जवळील विहीर स्वच्छ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्याने ही विहीर झाडाझुडपात गडबड झाल्याने अस्तित्वासाठी झगडतांना दिसत आहे.
गावाची तहान भागवायच्या
या तीनही विहिरींना पूर्वी मुबलक प्रमाणात पाणी असायचे. संपूर्ण गावाची तहान या विहिरीमधून भागायची. परंतु कालांतराने घरोघरी नळाद्वारे पाणी व हातपंप तयार झाल्याने या विहिरीच्या पाण्याचा उपयोग होणे बंद झाले. तसेच परिसरात कोळसा खदान झाल्याने या विहिरींचे पाणीसुद्धा आटले असल्याची माहिती आदासा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण धोटे (७६) यांनी दिली.
वृद्धाश्रमाजवळील विहिरीतील पाणी पिण्यासाठी गोड असल्याने आम्ही लहान असताना शाळेत आल्यावर या विहिरीत पायऱ्याद्वारे उतरून पाणी पिण्याचा आनंद घेत होतो.
हरिश्चंद्र सावध, सोनपूर