नागपूर : चार महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांवर १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे संतप्त एसटी कामगार संघटनेने आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. या पार्श्वभूमीवर, कामगार संघटनेने बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे चार महिन्यांपूर्वी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी ११ सप्टेंबर २०२३ ला कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सरकारच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. बैठकीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराची थकबाकी आदी प्रलंंबित मागण्यांसंबंधाने सकारात्मक चर्चा झाली होती. पुढच्या १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र आता चार महिने झाले तरी ही बैठकच झाली नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर, आज १३ फेब्रुवारीपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दोन दिवसांपूर्वी सरकारला दिला होता. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी
गणेशपेठ मधील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार, विभागीय सचिव प्रशांत बोकडे, पद्माकर चंदनखेडे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी प्रवीण पुणेवार, जगदीश पाटमासे, शशिकांत वानखेडे, मीना बोन्द्रे, माधुरी वालदे, दिलीप माहुरे, सुनील झोडे, मनोज बघले, प्रदीप पुराम, रफिक दिवाण, योगेश टवले, मंगल चहांदे, प्रवीण अंजनकर, प्रशांत उमरेडकर, मंगेश कुबडे, गजानन दमकोंडवार, नाना आंग्रेकर, प्रमोद वाघमारे, सुनील मेश्राम, जुगेश चौधरी, मनीष बक्सरे, प्रशांत लांजेवार, प्रफुल वाढोनकर, राजेश खांडेकर, सतीश धकाते, राजेश पेंढारी, मो. इलियाज, विनोद धाबर्डे, युवराज बुले, गजबे, पवन नागपुरे, मुकुंद मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे सभासद हजर होते.