सुमेध वाघमारे नागपूर : उपचार सुरू असताना अचानक पत्नीचे ‘ब्रेन डेड’ झाले. कुटुंबावर शोककळा पसरली. त्या दु:खातही पतीने आपल्या पत्नीला अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने दोन्ही किडनी, यकृत व बुबुळाचे दान केले. यामुळे तीन रुग्णांना नवे जीवन मिळाले. या वर्षातील हे दहावे अवयवदान ठरले.
जरीपटका नारी वसाहतीतील रहिवासी सीमा सुरेंद्र वाघमारे (वय ४८) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, सीमा यांना अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. लागलीच त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ‘ब्रेन हॅमरेज’ म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ६ मे रोजी त्यांना पुन्हा ‘स्ट्रोक’ आला. उपचारात शर्थीचे प्रयत्न सुरू असताना त्यांची प्रकृती खालवत गेली. ९ मे रोजी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. याची माहिती त्यांचे पती सुरेंद्र वाघमारे यांना देण्यात आली.
त्यांना बारा वर्षाची तनया व दहा वर्षाची जान्हवी या दोन मुली आहेत. अचानक पत्नी, आई गेल्याचे दु:खात कुटुंब होते. ‘एम्स’च्या डॉक्टरांनी कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व सांगितले. आपल्या मायाळू पत्नीला अवयवरूपी जिवंत ठेवता येईल, या आशेवर सुरेंद्र व कुटुंबांनी अवयवदानाला परवानगी दिली. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक वीणा वाटोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यांचे यकृत व दोन्ही मूत्रपिंड गरजू रुग्णाला तर, बुबूळ महात्मे आयबँकेला दान करण्यात आले.